मुलींनो..हातावर लावलेल्या मेहंदीला जास्त रंग चढण्यासाठी अवलंबा हे उपाय


सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरु आहे. विशेषतः समस्त स्त्रीवर्गाच्या उत्साहाला या वेळी उधाण आलेले असते. नवनवीन फॅशनच्या साड्या, ड्रेसेस, दागिने, याचबरोबर ब्युटी पार्लरच्या फेऱ्या देखील सुरु असतात. कपडे, त्याच्या जोडीच्या अॅक्सेसरीज्, मेकअप, यांच्या जोडीने लग्नाला उपस्थित असणाऱ्या महिलावर्गाच्या प्रसाधनाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्या हातावरील सुबक मेहेंदी. आपल्या हातावरील मेहेंदी सुंदर असावी, त्याचबरोबर तिचा रंग ही अगदी गडद चढावा अशी इच्छा सर्वच मुलींची असते. मेहेन्दीचा रंग चढावा या साठी काही अगदी सोपे उपाय अवलंबता येतील.

मेहेंदी हातांना लावण्याआधी हात स्वच्छ धुवून कोरडे करावेत. हाताला कुठल्याही प्रकारचे तेलकट क्रीम किंवा लोशन लावलेले असू नये, कारण त्यामुळे मेहेन्दीचा रंग चढणार नाही. मेहेंदी लावायला बसल्यानंतर हातावरची संपूर्ण मेहेंदी एकाच बैठकीत लावून पूर्ण करावी. मेहेंदी लावत असताना मध्ये मध्ये उठून जाण्याचे टाळावे. तसेच मेहेंदी लावून पूर्ण झाल्यानंतर, ती हातांवर कमीतकमी पाच ते सहा तासांपर्यंत राहू द्यावी. त्याआधी मेहेंदी हातांवरून काढून टाकू नये.

मेहेंदी सुकल्यानंतर हातांवर लिंबू आणि साखरेचे मिश्रण लावावे. त्याचबरोबर एक-दोन वेळा मोहोरीचे तेलही लावावे. त्याने मेहेन्दीचा रंग गडद होण्यास मदत होते. त्याचबरोबर तव्यावर काही लवंग टाकून त्यातून येणाऱ्या वाफेने हातांना शेक देत रहावा. असे केल्याने मेहेन्दीचा रंग जास्त चढतो. सुकेलेली मेहेंदी हातावरून काढण्यासाठी हातांवर मोहोरीचे तेल चोळून, त्याच्या मदतीने मेहेंदी उतरवावी. हात कोरडेच एकमेकांवर घासू नयेत. पाण्याने हात धुवून मेहंदी काढून टाकू नये. पाण्यामुळे मेहेन्दीचा रंग उतरतो, त्यामुळे मेहेंदी हातावरून काढून टाकल्यानंतरही किमान दहा तास पाण्यामध्ये हात घालू नयेत, किंवा हाताला साबण लावू नये.

मेहेंदी लावल्यानंतर आपले हात नेहमी गरम राहतील याची काळजी घ्या. एवढ्याच करिता लवंगांचा शेक घेणे, किंवा हातांना मोहोरीचे तेल लावणे हे उपाय करावेत. तुमचे हात जितके गरम राहतील, तितकाच मेहेन्दीचा रंग जास्त गडद होईल.

Leave a Comment