मराठमोळ्या डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल पदी नियुक्ती


नवी दिल्ली : शनिवारी लेफ्टनंट जनरल पदावर मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना बढती देण्यात आली असून कानिटकर यांची गेल्या वर्षीय लेफ्टनंट पदी निवड झाली होती, शनिवारी त्यांनी जागा रिक्त झाल्यानंतर पदभार स्वीकारला. त्या या पदावर निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या तर देशातील तिसऱ्या महिला अधिकारी बनल्या आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (इंटीग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस) म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. पुनिता अरोरा यांचा लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान आहे. यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. आता लेफ्टनंट जनरलपदी माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तळप्रमुखासारख्या नेतृत्वपदी महिलांच्या नियुक्तीची मार्ग काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे महिला लष्करी अधिकाऱ्यांनी स्वागत केले होते. सरकारने लष्करामध्ये लिंगाधारित भेदभाव संपवण्यासाठी आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याची भावना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती.

डॉ. माधुरी कानिटकर यांचा अल्प परिचय – १९८० साली डॉ. माधुरी कानिटकरांनी एमबीबीएसमधून पदवी घेतली. पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांना तेथे असताना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले होते. पेडियाट्रिकमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवरील उपचाराचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या माधुरी कानिटकर या पहिल्या अधिष्ठाता होत्या. मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी त्यांनी पुणे आणि दिल्लीत केंद्रे सुरू केली आहेत. कानिटकर यांचे पती राजीव कानिटकर लष्करात लेफ्टनंट जनरल होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. दाम्पत्याने लष्करात लेफ्टनंट जनरलपद स्वीकारल्याची ही पहिलीच घटना आहे.

Leave a Comment