तृप्ती देसाईंनी माफी मागण्यासाठी इंदुरीकर महाराजांना धाडली नोटीस


अहमदनगर: भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी लिंगभेदाबाबत केलेल्या एका विधानाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदुरीकर महाराजांना वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. दरम्यान, इंदुरीकरांविरुद्ध याआधी देखील देसाई यांनी पोलिसांत तक्रारही दिलेली आहे.

वकील मिलिंद पवार यांच्यामार्फत तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. देसाई यांनी या नोटीशीमध्ये १० दिवसांत उत्तर न दिल्यास थेट न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तमाम महिलांची इंदुरीकरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. ही नोटीस इंदुरीकर महाराजांच्या संगमनेरमधील ओझर बुद्रूक येथील पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.

महिलांचा इंदुरीकरांच्या कीर्तनातून सातत्याने अपमान केला जातो. इंदुरीकर महाराजांनी अद्याप जाहीरपणे यापुढे महिलांचा अपमान होईल, अशी वक्तव्ये मी करणार नाही, असे कुठेही सांगितलेले नसल्यामुळेच त्यांच्याविरुद्ध महिलांचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ही मागणी आम्ही लावून धरली तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून अनेक ठिकाणी आमचं चारित्र्यहनन करणारी भाषा वापरण्यात आली. अश्लील शिवीगाळ आम्हाला करण्यात आली. कापून टाकण्याची भाषाही केली गेली. म्हणूनच त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागायला हवी. यापुढे अशी कोणतीही वक्तव्ये करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करायला हवे, असे देसाई यांनी सांगितले.

Leave a Comment