सलमानने दत्तक घेतले पुरग्रस्त कोल्हापूरातील गाव


बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या कोल्हापुरातील पुराचा फटका बसलेल्या गावासाठी खऱ्या अर्थाने ‘बजरंगी भाईजान’ ठरला आहे. सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव दत्तक घेणार असून या गावातील पूरग्रस्तांना तो पक्की घरे बांधून देणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील बरीच गावे या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तत्कालीन राज्य सरकारपासून अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता ‘भाईजान’ने उशिरा का होईना पण पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरे पुन्हा बांधून देण्यासाठी धाव घेतली आहे.

खिद्रापूर गाव सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून दत्तक घेतल्याची माहिती आहे. सलमान पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी पक्की घरे बांधून देणार आहे. या वृत्ताला अद्याप सलमान खानकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

ही कामे ठाकरे सरकार आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने केली जाणार आहेत. या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनासोबत एलान फाऊंडेशनने करार केला आहे. महाराष्ट्र शासनाने या कामाचा आढावा घेण्यासाठी सात सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे.

भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा लहानसा प्रयत्न आहे. सहकार्याबद्दल सलमान खानचे आभार’ अशी प्रतिक्रिया ‘एलान फाऊंडेशन’च्या संचालकांनी व्यक्त केली.

Leave a Comment