दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव २४२ धावांत आटोपला


नवी दिल्ली – भारतीय फलंदाजांनी ख्राईस्टचर्च कसोटीतही संघाला मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका बसला आहे. भारतीय संघाची चहापानाच्या सत्रानंतर न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाल्यामुळे भारतीय संघ पहिल्या दिवशी २४२ धावांत गारद झाला. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.

कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. भारताने मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने आपल्या फलंदाजीत बदल करत चांगले फटके खेळले. पण मयांक अग्रवालला ट्रेंट बोल्टने माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिल्यानंतर चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने पृथ्वीने भारतीय संघाचा डाव सावरला. पृथ्वीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत काही सुरेख मैदानी फटके खेळले. पृथ्वीने निल वँगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपले अर्धशतकही साजरे केले. पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. पण पृथ्वीला अर्धशतकी खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. जेमिनसनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने पृथ्वीचा सुरेख झेल टिपला.

उपहाराच्या सत्रानंतर टीम इंडियाचे महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाले. विराट ३ धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर तर रहाणे ७ धावांवर माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजारा आणि हुनमा विहारीने संयमी खेळी करत भारताची अधिक पडझड थांबवली. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ८१ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने यादरम्यान आपले अर्धशतक साजरे केले. पाठोपाठ हनुमा विहारीनेही अर्धशतक झळकावले. हनुमा विहारी चहापानाच्या सत्राआधी वँगरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ५५ धावांची खेळी केली.

भारतीय फलंदाजांनी चहापानाच्या सत्रानंतर पुन्हा एकदा हाराकिरी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. मोहम्मद शमीने अखेरच्या फळीत फटकेबाजी करत भारताला २४२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारताच्या शेपटाला गुंडाळण्याचे काम उंचपुऱ्या जेमिसनने केले. न्यूझीलंडकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर निल वँगरने १ बळी घेतला.

Leave a Comment