1 मार्चपासून गॅस सिलेंडर ते जीएसटीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. यामध्ये गॅस सिलेंडरचे भाव, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम, बँक खात्याचे केवायसी, जीएसटी, डेबिट-क्रेडिट कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे.
1 मार्चपासून या 5 नियमांमध्ये होणार बदल
2000 रुपयांची नोट –
2000 रुपयांच्या नोटांसंबंधी इंडियन बँकेने मोठा निर्णय घेतला असून, 1 मार्चपासून इंडियन बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. या संबंधी बँकेने 17 फेब्रुवारी 2020 ला एक सर्क्युलर जारी केले होते.
थेट बँकेतून ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा मिळतील. हा निर्णय केवळ इंडियन बँकेने घेतला असून, इतर कोणत्याही बँकेने 2000 रुपयांच्या नोटांसंबंधी असा निर्णय घेतलेला नाही.
गॅस सिलेंडर –
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला गॅसच्या किंमतीत बदल होत असतात. फेब्रुवारीमध्ये 12 तारखेला किंमतीत बदल करण्यात आला होता. इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार, फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 144.50 रुपयांनी वाढून 858.50 रुपये झाले होते. मुंबईत किंमत 829.50 रुपये होती.
लॉटरीवर जीएसटी –
1 मार्चपासून लॉटरीवर 28 टक्के जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाच्या नवीन नियमांनुसार लॉटरीवरील केंद्रीय कर दर 14 टक्के करण्यात आला आहे आणि राज्य सरकारही त्याच दराने कर वसूल करतील.
क्रेडिट-डेबिट कार्ड –
आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट-क्रेडिट कार्डाच्या नियमात बदल केले आहेत. बँकांना निर्देश दिले आहेत की, एटीएम आणि प्वाइंट ऑफ सेलवर केवळ डोमेस्टिक कार्डांना परवानगी द्यावी. ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळी परवानगी द्यावी लागेल.
या व्यतिरिक्त ऑनलाईन, कार्ड आणि कॉन्टॅक्ट लेस व्यवहारासाठी कार्डवर सेवाना पुन्हा सेट करावे लागेल. नवीन नियम 16 मार्चपासून लागू होतील. ग्राहक कोणत्याही वेळी आपल्या व्यवहाराच्या मर्यादेत बदल करू शकतात.
एसबीआय खातेदारांसाठी नियम –
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मेसेजद्वारे ग्राहकांना आपली केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगितले होते. असे न केल्यास खाते बंद होऊ शकते. केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील.