हॉंगकॉंग मध्ये कुत्र्याला करोनाची लागण


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
हॉंगकॉंगमध्ये एका पाळीव कुत्र्याला करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून या कुत्र्याला पशुकेंद्रात वेगळे ठेवले गेले आहे. त्याच्या नमुन्यात करोना विषाणू अल्प प्रमाणात सापडले असून त्याच्या तपासणीचे नमुने जो पर्यंत निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत त्याला पशु केंद्रातच ठेवले जाणार आहे.

हॉंगकॉंगच्या कृषी मत्स्य विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार या कुत्र्याच्या ६० वर्षीय मालकिणीला करोनाची लागण झाली आहे. या कुत्र्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती मात्र जेव्हा त्याचा तोंडातील लाळेचे व नाकातील द्रवाचे नमुने तपासले गेले तेव्हा त्यात कोवीड १९ विषाणू अल्प प्रमाणात सापडले. या कुत्र्याची तपासणी का केली गेली याचे कारण दिले गेलेले नाही. शहरातील ही पहिलीच केस असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिकांनी माणसाकडून प्राण्यांना या विषाणूचे संक्रमण होणार नाही असे स्पष्ट केले होते. दरम्यान चीन मधील या विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २८३५ वर गेला आहे.

Leave a Comment