असे आहे राष्ट्रपती भवन मधील किचन


फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस
भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती आहेत. त्याचा निवास राष्ट्रपती भवनात असतो आणि विदेशातून येणाऱ्या बड्या पाहुण्याचे आगतस्वागत येथे केले जाते आणि त्यांच्यासाठी खास मेजवान्याही आयोजित केल्या जातात. नुकतेच भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि त्यांच्या परिवाराला येथे मेजवानी दिली गेली आणि मेजवानीतील पदार्थ ट्रम्प याना खुपच आवडल्याची वर्णनेही प्रसिध्द झाली.

पाहुण्यांना बोटे चोखायला लावणारे हे विविध पदार्थ राष्ट्रपती भवनाच्या ज्या मुद्पाकखान्यात तयार होतात तो आहे तरी कसा याचे अनेकांना कुतूहल असले. त्याच्यासाठी ही खास माहिती.


राष्ट्रपती भवनात दोन स्वयंपाकघरे किंवा किचन असून ती अत्याधुनिक आहेत. एक किचन छोटे आहे ते राष्ट्रपतींचे खासगी किचन असून दुसरे मोठे किचन फाईव्ह स्टार हॉटेलच्या किचनला मागे टाकेल इतके आधुनिक आहे. येथे अतिशय काटेखोरपणाने आणि वेळापत्रकानुसार काम चालते. येथील मुख्य शेफ आहेत मोंटी सैनी. त्याच्या हाताखाली ४५ जणांची टीम आहे. या किचनचे अनेक उपविभाग असून त्यात मुख्य किचन, बेकरी, मिठाई विभाग, काँटीनेन्टल ट्रेनिंग एरिया असे भाग आहेत. हा सर्व परिसर वातानुकुलीत आहे.


फोटो सौजन्य न्यूज १८
किचनच्या सफाईसाठी खास टीम आहे. ८०च्या दशकात या किचनचे आधुनिकीकरण केले गेले असून या मुद्पाकखान्याला रोज नवी आव्हाने पेलावी लागतात. रोजची डेडलाईन ठरलेली असते आणि त्यात एक मिनिट इकडे तिकडे होत नाही. रोजचे काम १५ ते १६ तास चालते. समारंभ असेल तर त्याची तयारी बरीच आधीपासून सुरु होते. मेन्यू ठरविला जातो त्यानुसार कटलरी, क्रोकरी, काच सामान याची मागणी केली जाते. या सर्व वस्तूंवर राष्ट्रीय प्रतीके असतात. मेन्यू फायनल झाला की येथील प्रिंटिंग प्रेस मध्ये तो छापला जातो. त्याचे डिझाईन करण्यासाठी स्वतंत्र विभाग असतो.

या मुदपाकखान्यात बनणारे सामोसे, ढोकळे आणि कचोरी अप्रतिम चवीचे असतात असा लौकिक असून येथे शक्यतो भारतीय पदार्थच बनविले जातात. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार बनतात शिवाय डेझर्ट असतात. चहा, कॉफी नंतर खास पान आणि मुखशुद्धी दिली जाते. मेजवानी सुरु असताना नौसेनेचा बँड असतो. येथे वापरले जाणारे मसाले आणि भाज्या राष्ट्रपती भवनाच्या गार्डनमधेच सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जातात.

Leave a Comment