अरेच्चा ! मृत्यूनंतर 10 तासांनी जिंवत झाली महिला

युक्रेनमध्ये 83 वर्षीय वृद्ध महिलेला डॉक्टर आणि पोलिसांनी मृत घोषित केल्यानंतर 10 तासानंतर अचानक महिला जिंवत झाल्याची घटना समोर आली आहे. स्टिरजावका शहरात राहणाऱ्या निवृत्त नर्स जीनिया दिदुख या मागील रविवारी स्टेज 3 कोमामध्ये गेल्या होत्या. कुटुंबाने घरीच डॉक्टरांना उपचारासाठी बोलवून घेतले. जीनिया यांची तब्येत हॉस्पिटलमध्ये नेल्यावर अजून खराब होऊ शकते, त्यामुळे त्यांना घरीच आराम करू द्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

डॉक्टर गेल्यावर वृद्ध महिलेने श्वास घेणे बंद केले. यावेळी कुटुंबाने डॉक्टरांसोबत पोलिसांना देखील बोलवले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबाने अंत्यसंस्काराची देखील तयारी केली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील जारी केले. थडगे खोदण्यासाठी एका पादरीला देखील बोलवले. जीनिया यांना दफन करण्याची तयारी सुरू असतानाच, त्यांच्या मुलीला काहीतरी विचित्र जाणवले.

त्यांच्या मुलीने सांगितले की, सांयकाळी त्यांच्या माथ्याला स्पर्श केला, तर ते गरम होते. याचा अर्थ त्या जिंवत होत्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

वृद्ध महिलेचा उपचार करणारे डॉक्टर व्लादिमीर चेबोतारोव यांनी सांगितले की, मी माझ्या 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असे कधीच बघितले नाही. हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्या स्टेज 3 कोमामध्ये होत्या. त्यांना ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले व एक आठवड्यातच त्या कोमामधून बाहेर आल्या.

बरे झाल्यानंतर जीनिया यांना कोमामध्ये असताना काय पाहिले असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मी स्वर्ग पाहिला आणि तेथे जाऊन आपल्या वडिलांना आवाज दिला. मला वाटत होते ते मला भेटतील. मात्र डोळे उघडताच माझ्या आजुबाजूला पांढरे कपडे घातलेले फरिश्ते आहेत, असे वाटले. मात्र ते डॉक्टर होते. मला वाटते की, माझ्यावर देवाचीच कृपा झाली, ज्यामुळे मला पुन्हा जीवन मिळाले.

Leave a Comment