या मंदिराचा पाया भरताना ४० हजार किलो तुपाचा झाला वापर


फोटो सौजन्य फ्लिकर
कोणतेही बांधकाम करताना वाळू, सिमेंट, विटा आणि पाणी लागतेच. राजस्तान मधील एक सुंदर मंदिर बांधताना मात्र त्याचा पाया भरताना ४० हजार किलो तूप वापरले गेले होते. बिकानेर मध्ये असलेले हे जगप्रसिद्ध मंदिर भांडाशाह जैन मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर बांधायची सुरवात भांडशाह नावाच्या व्यापाऱ्याने १४६८ मध्ये केली होती पण या मंदिराचे काम १५४१ मध्ये त्यांच्या मुलीने पूर्ण केले असे इतिहास सांगतो.

१०८ फुट उंचीचे, हे तीन मजली मंदिर जैनांचे पाचवे तीर्थंकर भगवान सुमतिनाथ याना वाहिलेले असून लाल दगड आणि संगमरवर दगड त्यासाठी वापरला गेला आहे. मंदिराची आतली आणि बाहेरची सजावट अतिशय सुंदर आहे. मथेरन आणि उसा कलेचा हा उत्तम नमुना मानला जातो. मंदिराचे छत, भिंती, फारशी, खांब यावर अनेक मूर्ती आणि सुंदर चित्रे रेखाटली गेली आहेत. या मंदिराला ५०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय डाक विभागाने एक विशेष तिकीट प्रकाशित केले होते.


या मंदिराची कथा अशी सांगतात की भांडाशाह या व्यापाऱ्याला एक मंदिर बांधायची इच्छा होती. एकदा ते काही लोकांसमवेत त्याविषयी चर्चा करत होते तेव्हा शेजारी असलेल्या तुपात माशी पडली. भांडाशाह यांनी माशी काढून टाकली व बाकी तूप वापरले तेव्हा शेजारच्या माणसाने तुपातली माशी फेकून तूप वापरणारा हा कंजूष मंदिर कसे बांधणार अशी टीका केली. तेव्हा भांडाशाह यांनी मंदिराचा पाया उभारताना ४० हजार किलो तूप वापरले. हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारकात समाविष्ट केले गेले आहे.

Leave a Comment