चीन पोलिसांच्या तुलनेत कुठे आहेत भारतीय पोलीस?


फोटो सौजन्य द व्हर्ज
चीन हा भारतासारखाच प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे आणि आपल्याप्रमाणेच तेथेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. मात्र चीनी पोलीस आणि भारतीय पोलीस यांची तुलना केली तर चीनी पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक कार्यक्षम झाले असल्याचे दिसून येते. चीनी पोलिसांना नुकतेच स्मार्ट चष्मे देण्यात आले असून त्याच्या मदतीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयित गुन्हेगारांची धरपकड करण्यात यश मिळविले आहे.

या स्मार्ट चष्म्यात आर्टिफीशीयल इंटेलिजन्स तंत्राचा वापर केला गेला आहे. हा चष्मा हातातल्या एका उपकरणाला जोडलेला असतो. संशयित आरोपी दिसला की हा चष्मा त्याचा डेटा बेस स्कॅन करतो. त्यामुळे संशयिताला त्वरित पकडणे पोलिसांना सहज शक्य होते. भारतीय पोलिसांना असे चष्मे कधी मिळणार याची काहीही माहिती देता येत नाही. चीन सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे की त्यांच्याकडे १७ कोटी सीसीटीव्ही लावले गेले असून त्यातील काही चेहरा स्कॅन करणारे आहेत. या सुविधेचा आणखी विकास करण्यात येत आहे.


चीनी पोलिसांना खास हेल्मेट दिली आहेत मात्र भारतीय पोलीस खाकी किंवा निळ्या टोपीत दिसतात. चीनी हेल्मेट ही ई कॅमेरा टोपी असून त्यात घडत असलेली पूर्ण घटना रेकॉर्ड होते आणि पोलीस मुख्यालयाला पाठविली जाते. चीनी पोलिसांचे हेल्मेट बुलेट प्रूफ आहे. या उलट भारतीय पोलिसांच्या हातात दंडुके दिसतात. अर्थात काही ठिकाणी आता पोलिसांना रिव्होल्व्हर दिली गेली आहेत. चीनी पोलीसांकडे दूरचा रेंजची ऑटोमॅटिक पिस्तुले आहेत.

चीनी पोलिसांना गुन्हेगाराच्या पाठ्लागासाठी ऑटोमॅटिक मल्टीपर्पज स्कुटर आहेत तर भारतीय पोलिसांकडे काही प्रमाणात मोटर बाईक असल्या तरी बहुतेक पोलीस पायी जातानाच दिसतात. चीनी पोलिसांना सुपर बाईक दिल्या गेल्या आहेत त्यामुळे ते वेगाने पाठलाग करू शकतात.

Leave a Comment