दिल्लीतील हिंसाचार पुर्वनियोजित, अमित शाहांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

दिल्लीत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिसांचाराबाबत काँग्रेस वर्किंग कमेटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते.

बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सोनिया गांधी यांनी दिल्लीतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, दिल्लीतील हिंसाचार पुर्वनियोजित कट आहे. भाजपच्या नेत्यांनी भडकाऊ भाषणे दिली. निवडणुकीवेळी द्वेष पसरवला. दिल्लीच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.

सोनिया गांधी या वेळी म्हणाल्या की, रविवारी गृहमंत्री कोठे होते व काय करत होते ? हिंसाग्रस्त भागात किती पोलीस तैनात होते ? परिस्थिती बिघडल्यानंतर देखील सैन्याला का पाचारण करण्यात आले नाही ? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय करत होते ?, असे प्रश्न सोनिया गांधी यांनी केले.

बैठकीच्या आधी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील दिल्ली पोलिसांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. त्यांनी ट्विट केले की, गृहमंत्री असो अथवा गृहमंत्रालय, सरकारचे कर्तव्य आहे की त्यांनी हिंसा थांबवावी. हिंसा सोमवारपासून सुरू असून, आताही काही भागात हिंसेच्या घटना घडत आहेत. यातून दिल्ली पोलिसांचे प्रचंड अपयश दिसून येत आहे.

दरम्यान, दिल्लीच्या काही भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. हिंसाचारात आतापर्यंत 20 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Leave a Comment