इस्रोप्रमुख सिवन यांनी शाओमी वापरावा, मनु जैन यांचे संकेत


फोटो सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया
शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबल उपाध्यक्ष मनुकुमार जैन यांनी इस्रोप्रमुख डॉ. के सिवन यांनी शाओमीचा फोन वापरावा असे संकेत त्यांच्या ट्विटरवरील फोटोतून दिले आहेत. या फोटोत जैन सिवन यांना शाओमी रेडमी के २० प्रो फोन देताना दिसत आहेत त्याचवेळी सिवन यांच्या खिशातून जुना सॅमसंग गॅलेक्सी फोन डोकावताना दिसत आहे. जैन यांनी भारतात स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम NAV LC सह फोन सादर करणारा शाओमी हा पहिला ब्रांड असेल अशी घोषणा केली आहे. अर्थात जैन यांनी सिवन यांना दिलेल्या रेडमी के २० मॉडेलला NAV LC सपोर्ट नाही. पण तरीही जैन यांनी शेअर केलेल्या फोटो मधून अनेक अर्थ काढले जात आहेत त्याला तशी कारणेही आहेत.

जानेवारीमध्ये क्वालकॉमने तीन नवे चिपसेट स्नॅपड्रॅगन ७२० जी, ६६२ व ४६० लाँच केले आहेत. त्याला जीपीएस मेड इन इंडिया NAV LC सपोर्टचा पर्याय दिला गेला आहे. ही नेव्हिगेशन सिस्टीम इस्रोने विकसित केली आहे. जगात अनेक देशांनी आपापल्या नेव्हिगेशन सिस्टीम वापरात आणल्या आहेत. इस्रोने NAV LC सिस्टीम विकसित करताना फक्त भारतावर फोकस केला आहे. या सिस्टीमवर जीपीएस पेक्षा अधिक अचूक माहिती मिळते असा दावा केला जात आहे.

जीपीएस असताना NAV LC ची गरज काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे की १९९९ मध्ये कारगील युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला पाक सैन्याशी जोडलेला जीपीएस डेटा देण्यास नकार दिला होता आणि तेव्हा प्रथमच भारताला स्वतःच्या नेव्हिगेशन सिस्टीमची गरज तीव्रतेने जाणवली होती. त्यामुळे इस्त्रोने गेली वीस वर्षे संशोधन करून ही सिस्टीम बनविली असून क्वालकॉम आणि शाओमीबरोबर या सिस्टीम सह त्यांचे मोबाईल विकले जावेत यासाठी चर्चा सुरु केली होती. शाओमीने त्याला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.

Leave a Comment