भारत-पाक क्रिकेटवरून आफ्रिदीचा मोदींवर निशाणा

भारतीय क्रिकेट संघाने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तर पाकिस्तानने भारतात शेवटची एकदिवसीय व टी20 मालिका 2012 साली खेळली होती. गेल्या 8 वर्षांपासून दोन्ही संघात एकही मालिकी झालेली नाही. मात्र आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये दोन्ही संघ एकमेंकाविरोधात खेळताना दिसतात. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, भारत सरकारच्या परवानगी शिवाय दोन्ही संघात मालिका खेळली जाणार नाही.

आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारत-पाक क्रिकेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आफ्रिदी म्हणाला की, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होणार नाही.

एका मुलाखतीमध्ये आफ्रिदी म्हणाला की, मला वाटत नाही की जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत आम्हाला क्रिकेट मालिकेसाठी भारताकडून काही उत्तर मिळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदींचा विचार काय आहे. त्यांचा विचार नकारात्मक आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नात्यामध्ये द्वेष केवळ एका व्यक्तीमुळे निर्माण होत आहे. एक व्यक्ती दोन्ही दोन्ही देशांच्या नात्याला उद्धवस्त करत आहे.

आफ्रिदी म्हणाला की, भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांना एकमेंकांच्या देशात जायचे आहे. मला माहित नाही मोदींना काय हवे आणि त्यांचा अजेंडा काय आहे ?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेहनतीमुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट पुन्हा सुरू झाले असून, जगातील प्रत्येक संघ पाकिस्तानमध्ये येईल. आशा आहे की भारत देखील येईल, असेही आफ्रिदी म्हणाला.

याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये मालिका व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

Leave a Comment