कपिल देव यांनी घेतली टीम इंडियाची शिकवणी

न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने मानहानीकारक पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहे. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका टिव्ही चॅनेलशी बोलताना कपिल देव म्हणाले की, आपल्याला न्यूझीलंडचे कौतूक करावे लागेल. ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. मागील 3 एकदिवसीय सामने आणि या कसोटी सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. या सामन्याबाबत विचार केल्यावर कळत नाही की कोणी एवढे बदल कसे काय करू शकतो. प्रत्येक सामन्यात एक नवीन संघ आहे. कोणीही संघात कायमस्वरूपी नाही. जर खेळाडूंच्या स्थानाबाबत काहीही निश्चित नसेल, तर याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होईल.

भारतीय संघातील मधली फळी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे सामन्यातील दोन्ही डावात मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरले होते.

कपिल देव म्हणाले की, बँटिंग क्रमवारीत अनेक मोठी नावे आहेत. मात्र तुम्ही दोन्ही डावांमध्ये 200 धावा करू शकत नसाल, तर तुम्ही जिंकू शकत नाही. तुम्हाला योजना आणि रणनितीवर लक्ष देण्याची गरज आहे.

टी20 मालिकेत मालिकावीर ठरलेल्या केएल राहुलला संघात का स्थान दिले नाही, याबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

कपिल देव म्हणाले की,  आम्ही खेळायचो त्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही संघ निर्माण करता, त्यावेळी खेळाडूंना आत्मविश्वास द्यायला हवा. अनेक बदल करणे, याला काही अर्थ नाही. व्यवस्थापन प्रत्येक फॉर्मेटनुसार खेळाडूंची निवड करण्यावर विश्वास ठेवत आहे. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र त्याला बाहेर बसवण्यात आले आहे. याला काहीच अर्थ राहत नाही. मला वाटते की, जेव्हा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तेव्हा त्याला निश्चितच खेळवले पाहिजे.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील दुसरा व अंतिम कसोटी सामना 29 फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे.

Leave a Comment