सौरव गांगुलीची बायोपिक ‘दादागिरी’ नावाने येणार?


फोटो सौजन्य फ्लिपकार्ट
बायोपिक बनवावी इतका मी कुणी महान नाही असे बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली याने काही दिवसांपूर्वी म्हटले असले तरी मुंबई मिररच्या बातमीनुसार सौरव गांगुली यांच्यावर लवकरच बायोपिक बनविली जाईल असे समजते. सौरव गांगुली दादा या नावाने क्रिकेट जगतात ओळखला जातो त्यामुळे त्याची बायोपिक ‘दादागिरी’ नावाने येईल असेही सांगितले जात आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचे पीक आले असून अनेक खेळाडू, राजकारणी यांच्यावर बायोपिक बनत आहेत. कपिल देववर बनत असलेला ८३ लवकरच रिलीज होणार आहे. माजी कप्तान धोनी, सचिन तेंडूलकर, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर बायोपिक आल्या आहेत तर महीला क्रिकेट टीमची कप्तान मिताली राज, गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्यावरच्या बायोपिक निर्मिती अवस्थेत आहेत. या सर्व चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीची घेतलेली भेट चर्चेचा विषय बनली आहे.

करण जोहर सौरव गांगुलीवर चित्रपट बनविणार असल्याचे सांगितले जात असून लीड रोलसाठी शोध सुरु असल्याचेही समजते. सौरवचे करियर, कप्तानी व त्याच्याशी संबंधित वादविवाद नेहमीच चर्चेत राहिले आहेत त्यामुळे हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल असाही अंदाज वर्तविला जात आहे. सौरवची भूमिका कोण करेल याची उत्सुकता असून अक्षयकुमार, रणबीर कपूर, सुशांतसिंग राजपूत, राजकुमार राव आणि शाहरुख खान यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment