अयोध्येतील राममंदिर बनेल जगातील आठवे आश्चर्य


फोटो सौजन्य हरीभूमी
अयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागी सर्वोच्च न्यायालयांच्या निकालानंतर उभारले जाणारे राममंदिर हे जगातील आठवे आश्चर्य असेल असे संकेत दिले गेले आहेत. हे मंदिर मक्का मदिना आणि व्हेटिकन सिटीपेक्षा अधिक मोठ्या जागेत उभारले जाणार असून रामलला ला मौल्यवान रत्नांनी सजविले जाणार आहे. तसेच गर्भगृह सोन्याचे बनविले जाणार आहे असे सांगितले जात आहे. रामलालाच्या नावाने स्टेट बँकेत एक खाते उघडले जात आहे. ज्यांना देणगी द्यायची आहे ते भाविक या खात्यात रक्कम जमा करू शकणार आहेत.


रामजन्मभूमी न्यास ट्रस्टची पहिली बैठक नुकतीच पार पडल्याने आता राममंदिर उभारणीचा मुहूर्त लवकरच काढला जाईल असे सूचित केले गेले आहे. हे मंदिर स्थापत्याचा बेजोड नमुना असेल आणि एकावेळी २० हजार भाविक येथे आरती करू शकतील. नागर शैलीत मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. मंदिराचा आराखडा विश्वहिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांच्या सांगण्यानुसार १९८७ सालीच बनविला गेला आहे. त्यात काही बदल हवे असल्यास त्याचा निर्णय नवीन ट्रस्ट घेणार आहे.

पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे मंदिर ६० एकर जागेत उभारले जाणार होते आता ते १०० एकर जागेत उभारण्याचा विचार सुरु आहे. मंदिर दोन किंवा तीन मजली असेल आणि रामललाची मूर्ती एकाच ठिकाणी असेल. मंदिर बांधकामासाठी १०० कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.


फोटो सौजन्य वेबदुनिया
या मंदिराचा आराखडा गुजराथच्या पालीताणा येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केला असून त्याच्या घरातील १६ पिढ्या गेली कित्येक वर्षे देशविदेशात भव्य मंदिर बांधकाम करत आहेत. स्वतः चंद्रकांत यांनी हिंदू, जैन आणि स्वामीनारायण संप्रदायाची १०० हून अधिक मंदिरे बांधली आहेत. १९९७ मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट पुरस्कार दिला गेला असून गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंदविलेले लंडनचे पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर त्यांनीच बांधले आहे.

अयोध्येतील राममंदिरात प्रत्यक्ष राममंदिराचा आकार भगवान विष्णूच्या आवडत्या अष्टकोनी प्रकारात असेल. या मंदिर बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. मंदिर २४० फुट लांब, १४५ फुट रुंद आणि १४१ फुट उंच असेल. पहिल्या मजल्यावर रामाचा दरबार असेल. या मंदिर प्रांगणात अन्य ५ मंदिरे असतील आणि चार प्रवेशद्वार असतील असे समजते.

Leave a Comment