बंकरमध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधेल कॉक्रोच ड्रोन


पहाडात, जंगलात, बंकर मध्ये लपलेल्या शत्रूचा अचूक शोध घेऊ शकेल असे एक छोटेसे ड्रोन आयआयटी कानपूर आणि भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड यांनी परस्पर सहकार्यातून विकसीत केले असून ते आर्टिफीशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर काम करते. याचे नाव कोक्रोच म्हणजे झुरळ ड्रोन असे असून त्याला इंसेक्ट कॉप्टर असे म्हणतात. शत्रूला फसवून हे शत्रूवर बारीक नजर ठेऊ शकते.

सध्या हे ड्रोन भारत इलेक्ट्रोनिक्सकडे टेस्टिंग साठी सोपविले गेले असून जूनपर्यंत त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर ते सेना, निमलष्करी दले, अंतरिक सीमा सुरक्षा या विभागाकडे सोपविले जाणार आहे. हे ड्रोन रेल्वेट्रॅक, वीज तारा, रेस्क्यू ऑपरेशन, पूर, आग निरीक्षणासाठीही उपयुक्त आहे. पूर्वी या ड्रोनचे वजन ४० ग्राम होते ते आता २२ ग्रामवर आले असून ते तळहातावर सहज मावते. सामान्य ड्रोन एकाजागी फार वेळ राहू शकत नाही मात्र हे ड्रोन भिंतीला एखाद्या किड्याप्रमाणे दीर्घ काळ चिकटून राहू शकते शिवाय दोन तासापर्यंत व्हीडोओ फोटो घेऊ शकते.

हे ड्रोन भिंतीवर चिकटलेले असेल तेव्हा त्याची मोटर बंद होते त्यामुळे बॅटरी बॅकअप वाढतो. त्याच्यावर अनेक सोफ्टवेअर इंस्टॉल करता येतात. त्यासाठी गीको तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या ड्रोनला किटकाप्रमाणे आठ पाय असून त्यामुळे त्याची पकड मजबूत आहे. ते रात्रीही काम करू शकते. शिवाय मुंग्यांच्या रांगेप्रमाणे ही ५-६ ड्रोनची चेन तयार करता येते. त्यात धोका जाणवला तर ही ड्रोन एकमेकांना संदेश देतात.

अमेरिका, रशिया, चीन या देशांकडे अशी उपकरणे सेनेसाठी वापरली जातात. अमेरिकेने डासाच्या आकाराचे ड्रोन बनविले असून माशी, पतंग या आकाराची ड्रोनही बनविली गेली आहेत.

Leave a Comment