अमेरिकन अध्यक्षांच्या कारचालकाची ही असतात वैशिष्टे


फोटो सौजन्य अमरउजाला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आज त्यांच्या परिवारासह भारतात पोहोचत आहेत. भारतात ते त्याची खास कार कॅडेलिक वन मधून प्रवास करतील. ट्रम्प यांच्या सुरक्षेत अनेक प्रकाराची दले सामील आहेत पण त्याच्या या खास कारसाठी नेमला जाणारा चालक कसा निवडला जातो आणि त्याची काय खास वैशिष्टे असतात याची फारशी माहिती बाहेर येत नाही. तर या अभेद्य कारचा चालक हा नुसता ड्रायव्हर नसतो तर तो एखाद्या कमांडो प्रमाणे प्रशिक्षित केलेला आणि जेम्स बॉंड प्रमाणे इंटेलिजंट व्यक्ती असतो.

अमेरिकन अध्यक्षांची ही अभेद्य कार बॉम्ब, मिसाईलचा परिणाम न होणारी आहे. या कारच्या चालकाची निवड प्रक्रिया खुपच अवघड आहे. या चालकाला क्षणाच्या अवधीत महत्वाचे निर्णय घेता येणे आवश्यक असतेच पण त्याचा मेंदू, प्रकृतीची रोज तपासणी केली जाते. निवडीसाठी एकापेक्षा अनेकांची निवड प्रथम केली जाते. त्यानंतर त्यांना युएस सिक्रेट सर्व्हीसतर्फे कडक प्रशिक्षण दिले जाते. आणि या प्रशिक्षणात जो उत्तम ठरेल त्याची निवड केली जाते. त्याला केवळ ड्रायविंग येणे पुरेसे नाही तर एखाद्या कमांडोप्रमाणे त्याला कोणताही हल्ला परतवून लावणे किंवा गरज भासल्यास हल्ला चढविता येणे अत्यावश्यक असते.

तो वेळ पडल्यास शत्रूला मारहाण करू शकतो, बंदूक चालवू शकतो आणि अतिशय वेगाने पण पूर्ण सुरक्षित ड्रायव्हिंग करू शकतो. कोणत्याही अडचणीच्या जागेतून वेगाने बाहेर पडण्याचे ट्रेनिंग त्याला दिले जाते. तसेच आणीबाणीच्या वेळी तो अतिशय वेगाने रिव्हर्स ड्रायव्हिंग करू शकतो आणि १८० डिग्रीमध्ये कार टर्न करू शकतो तसेच वेगाने झिगझॅग ड्रायव्हिंगही करू शकतो. डोनल्ड ट्रम्प यांची सध्याची कार ११.५ कोटींची असून ही कार खास अमेरिकन अध्यक्षांसाठी बनविली जात असल्याने तिची विक्री केली जात नाही.

Leave a Comment