अनेक गुणांचा खजिना – काकडी


जगामध्ये सर्वप्रथम ज्या भाज्या पेरल्या आणि उगविल्या गेल्या त्यामध्ये काकडी या फळभाजीचा समावेश आहे. काकडीची पैदास भारतामध्ये सर्वात आधी उत्तर भारतामध्ये सुरु झाली. वर्तमान काळामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावर उगविल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये, टोमॅटो, कांदे, आणि फुलकोबी पाठोपाठ काकडीची पैदास सर्वात जास्त होत असते. अनेक जीवनसत्वे आणि क्षार यांनी परिपूर्ण असलेली ही फळभाजी आजकालच्या काळामध्ये ‘ सुपर फूड ‘ च्या श्रेणीपर्यंत येऊन ठेपली आहे.

काकडी हा एक लो कॅलरी अन्नपदार्थ असून, शंभर ग्राम काकडीमध्ये केवळ पंधरा कॅलरिज आहेत. वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी काकडीचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करायला हवा. यामध्ये अ, बी१, बी६, क ही जीवनसत्वे असून, काकडी पोटॅशियमची देखील उत्तम स्रोत आहे. शंभर ग्राम काकडीमध्ये सुमारे १४७ ग्राम पोटॅशियम असते, त्यामुळे याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत मिळते. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी देखील काकडीचे सेवन करणे चांगले.

काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असल्याने याच्या सेवनाने शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही. तसेच यामुळे शरीराचे तापमान देखील नियंत्रित राहण्यास मदत होते. काकडीमध्ये अनेक रोगोपचारक गुण आहेत. यामध्ये असलेले पॉलीफेनोल्स अनेक तऱ्हेच्या कर्करोगांपासून शरीराचा बचाव करण्यास सक्षम आहेत. काकडीमध्ये पाणी आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जाऊन शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते.

काकडीचा रस दररोज घेतल्याने गॅसेस, अॅसिडीटी, छातीत जळजळ अश्या अपचनाशी निगडीत तक्रारींना आळा बसतो. काकडी सिलिकाचे उत्तम स्रोत आहे. सिलीकामुळे शरीरातील कनेक्टीव्ह टिश्यू बळकट होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडीच्या रसाचे सेवन विशेष फायद्याचे आहे. काकडीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून काकडी त्वचेकरिता देखील चांगली आहे. काकडीमधील अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि क जीवनसत्वामुळे शरीरामध्ये कोलाजेनचे निर्माण होऊन त्यामुळे त्वचा सुंदर ब नितळ दिसू लागते. तसेच याच्या नियमित सेवनाने केसांचे आरोग्य देखील चांगले राहते.

काकडी विकत घेताना नेहमी गडद हिरव्या रंगाची काकडी निवडावी. सालांवर डाग असलेली, हाताला नरम लागणारी आणि जाडसर दिसणारी काकडी घेऊ नये. काकडी फ्रीजमध्ये स्टोअर करावी, मात्र कोणत्याही प्रकारची फळे काकडीजवळ ठेऊ नयेत, अन्यथा काकड्या लवकर पिवळ्या पडतील व त्यांची गुणवत्ता देखील कमी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment