सोनभद्रमध्ये फक्त १६० किलो सोने; जीएसआयचा खुलासा


नवी दिल्ली – तब्बल ३ हजार टन सोने उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सापडल्याचे वृत्त काल सर्वत्र पसरले होते. सोन्याच्या खाणी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सापडल्या आहेत, असे सांगण्यात येत होते. पण याबाबतची माहिती भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) फेटाळून लावली आहे. सुमारे १६० किलो सोने सोनभद्र जिल्ह्यात मिळाले असून तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे.

जिल्हा उत्खनन अधिकारी के.के. राय यांनी काल ३३५० टन सोने सापडल्याचा दावा केला होता. जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी याबाबत कोलकाता येथून माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही, असे माहिती त्यांनी दिली.

सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज जीएसआयने वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर देतो. या भागात १९९८-९९ आणि १९९९-२००० मध्ये आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) उत्खनन केले होते. उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे त्यासंबंधीचा अहवाल सोपविला होता.

Leave a Comment