मधुमेहींनी ही फळे जरूर खावीत


मधुमेह असलेल्या अनेक व्यक्ती फळे अजिबात वर्ज्य करतात, किंवा अगदी थोड्या प्रमाणात घेताना दिसतात. कारण फळांमधील साखरेने त्यांच्या रक्तातील साखर वाढेल याची चिंता त्यांना सतावत असते. पण अशी काळजी करण्याचे कारण नाही, कारण काही फळांचे सेवन मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. इतकेच नाही, तर या फळांमध्ये असणाऱ्या फायबर मुळे शरीराची पाचनशक्ती देखील चांगली राहते. फळांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्वे आणि पॉलिफेनॉल्स मुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्यासाठी कोणती फळे चांगली आहेत किंवा नाहीत हे ठरविण्यासाठी कुठलेही फळ घेतल्यानंतर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून बघणे चांगले. तसेच फळे खाताना सर्व फळ एकदम खाण्यापेक्षा एका वेळेस फळाचा काही भागच सेवन करावा.

मधुमेही व्यक्तींसाठी सफरचंद हे उत्तम फळ आहे. सफरचंदाच्या सेवनाने एलडीएल कोलेस्टेरोलची पातळी चाळीस टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते. हार्वर्ड विद्यापीठामध्ये केल्या गेलेल्या रिसर्चनुसार सफरचंदाच्या सेवनाने टाईप २ डायबेटीस उद्भविण्याची संभावना कमी होते. सफरचंदामध्ये सोल्युबल आणि ईन-सोल्युबल अशी दोन्ही प्रकारची फायबर असल्यामुळे त्याच्या सेवनानंतर पुष्कळ वेळ पर्यंत पोट भरलेले राहते. सफरचंद हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फळ असून, कॅल्शियम, लोह आणि अ जीवनसत्वाने युक्त आहे.

ब्लूबेरीज, रास्पबेरीज आणि क्रॅनबेरीज ही फळे मधुमेहींसाठी, काहीतरी गोड खाण्याची इच्छा अनावर होत असताना खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. ह्या बेरीज मध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असणारे फ्लावेनॉइड्स असून, बेरीज मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये असलेल्या अँथोसियानीन्स मुळे टाईप २ डायबेटीस होण्याची संभावना कमी होते. यांच्या सेवनाने हृदयातील चांगले कोलेस्टेरोल वाढून, हानिकारक कोलेस्टेरोल कमी होते. यामध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असून, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

अॅव्होकाडोमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मोनो-अनसॅच्यूरेटेड फॅट्स असल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्टेरोलची मात्र वाढण्यास मदत होते. विशेषतः महिलांनी या फळाचे सेवन केल्यास त्यांना टाईप २ प्रकारचा डायबेटीस उद्भविण्याची संभावना कमी असते. त्याचप्रमाणे टरबूज, खरबूज हे फळे देखील मधुमेहींसाठी अतिशय फायदेकारक आहेत. या मध्ये असणारी जीवनसत्वे डायबेटिक रेटीनोपथी पासून बचाव करणारी आहेत.

टोमॅटोचे सेवनही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेकारक आहे. यामध्ये अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये पोटॅशियम आणि हृदयाच्या आरोग्यास उत्तम असणारे लायकोपीन नावाचे तत्वही आहे. टोमॅटोमध्ये कर्बोदके कमी मात्रेमध्ये असतात. एक कप टोमॅटोच्या फोडींमध्ये केवळ ३२ कॅलरीज असतात. त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश जरूर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment