जाणून घ्या तुमच्या मनपसंत ‘सामोसा’चा इतिहास


‘चहा आणि सामोसा’ अशी ही खाद्यपदार्थांची घट्ट मैत्री आपल्या सर्वांच्याच चांगल्या परिचयाची आहे. पण सामोसा हा मुळातच भारतीय पदार्थ नाही. तो भारताच्या बाहेरून आला आहे. पूर्वी व्यापाराच्या निमित्ताने जे अरब व्यापारी भारतामध्ये येत असत, त्यांच्याकरवी हा खाद्यपदार्थ भारतामध्ये आला असण्याची शक्यता आहे. साधारण दहाव्या किंवा अकराव्या शतकामधील अरब भाषेतील पाकशास्त्राच्या पुस्तकामध्ये सामोश्याचा उल्लेख सापडतो. त्या काळी, आणि त्या काळीच नव्हे, तर आजही अरब प्रांतामध्ये ‘ साम्बुसक ‘ या नावाने ओळखला जाणारा सामोसा खूपच लोकप्रिय आहे.

पूर्वी व्यापाराच्या निमित्ताने व्यापारी लोक सतत देशांतर करीत असत. दिवसभर व्यापाराच्या ठिकाणी जाऊन, रात्रभर विश्रांतीसाठी कुठे तरी विसावत असत. त्या काळी हॉटेल्स किंवा खानावळी सर्रास उपलब्ध नसत. त्यामुळे एखाद्या गावाबाहेरच्या जागी मुक्काम करावयाचा झाल्यास, घरून तयार करून आणलेले ‘साम्बुसक’ हेच त्या व्यापाऱ्यांचे भोजन असे. ‘ साम्बुसक ‘ या शब्दाचा अरबी भाषेमध्ये अर्थ सांगितला जातो तो असा – ‘ से ‘ म्हणजे तीन आणि ‘ अम्बोस ‘ म्हणजे पोळीचा एक प्रकार. त्यामुळे तीन कडा असलेल्या पोळीमध्ये मटन, सुका मेवा आणि गरम मसाल्याचे मिश्रण भरून तळलेली पोळी म्हणजेच ‘ साम्बुसक ‘.

हा अरब देशामधील, लोकप्रिय असलेला पदार्थ, भारतामध्ये ही तयार केला जात असल्याचा उल्लेख मोरक्कन प्रवासी इब्न बतुता याने चौदाव्या शतकामध्ये लिहिलेल्या प्रवासवर्णनामध्ये सापडतो. मुहम्मद बिन तुघलक या राजाच्या शाही मेजवानीमध्ये हा पदार्थ बनविला गेला असल्याचा उल्लेख आहे. ‘ मटन, सुका मेवा आणि गरम मसाले यांचे मिश्रण घालून, तळून केलेली पोळी ‘ असे इब्न बतुताने सामोशाचे वर्णन करून ठेवले आहे. आजच्या काळामध्ये सामोसे अनेक नवनवीन रूपे घेऊन अवतरलेले असले तरी, बटाट्याची चविष्ट भाजी भरून तयार केलेला सामोसा आपल्या सर्वांच्याच जास्त परिचयाचा आणि आवडीचा आहे. पण त्याचबरोबर पनीर सामोसा, चाऊ मीन सामोसा, पास्ता सामोसा हे ही सामोशाचे प्रकार लोकप्रिय आहेत.

Leave a Comment