भारतातील सर्वात ‘स्वस्त आणि मस्त‘ हनिमून डेस्टीनेशन्स


सध्या लग्नसराईची धामधूम सर्वत्र सुरु आहे. विवाहसोहोळ्याची तयारी, खरेदी, आमंत्रणे इत्यादी गोष्टींबरोबर नवविवाहित दाम्पत्याने मधुचंद्रासाठी कुठे जावे, यावरही निरनिराळे सल्ले दिले जातात. भारतामधील गोवा, ऊटी, मुन्नार, सिमला, कुलू-मनाली इत्यादी ठिकाणे मधुचंद्रासाठी नेहमीच पसंत करण्यात आली आहेत. पण या लोकप्रिय स्थळांशिवायही काही स्थळे आशी आहेत, जी ‘परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन’ म्हणून नवविवाहित जोडप्यांच्या पसंतीला उतरू शकतात. हे सर्व स्थळे प्रेक्षणीय तर आहेतच, शिवाय बजेटमध्ये बसणारी देखील आहेत.

लक्षद्वीप हा द्वीपसमूह हनिमून डेस्टीनेशन म्हणून उत्तम पर्याय आहे. या द्वीप समूहांपैकी सहा बेटांवर जाण्याची अनुमती पर्यटकांना मिळते. कठमठ, मिनीकॉय, कवरत्ती, बंगाराम, कल्पेनी आणि अगाती या बेटांवरील वास्तव्य हनिमून कपल्स करिता खूपच चांगले ठरेल. या बेटांपैकी कठमठ बेटाजवळील समुद्रामध्ये स्नोर्केलिंग करण्याची संधी अवश्य घ्यावी. स्नोर्केलिंग करीत असताना निरनिराळ्या आकर्षक समुद्री जीवांचे विलोभनीय दर्शन घडते. या ठिकाणी स्नोर्केलिंग करण्याची संधी घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात. लक्षद्वीपला येण्यासाठी कोच्चीहून अगातीपर्यंतचा विमानप्रवास करता येतो. त्याशिवाय कोच्चीहून अनेक पॅसेंजर बोटींद्वारेही लक्षद्वीपला पोहोचता येते. येथे चार दिवस राहण्यासाठी माणशी किमान सहा हजार रुपये खर्च येतो.

ज्यांना प्राचीन संस्कृतीबद्दल कुतूहल असेल अश्या जोडप्यांनी हम्पी येथे जाण्याचा विचार करावा. कर्नाटक राज्यामध्ये असलेले हम्पी हे स्थळ युनेस्कोद्वारा ‘ वर्ल्ड हेरीटेज साईट ‘ म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू येत असतात. येथील परिसरामध्ये प्राचीन संस्कृतीची प्रतीके असणारी अनेक स्मारके आहेत. यांमध्ये मंदिरे, महाल, प्राचीन बाजारपेठा, अश्या अनेक पुरातन इमारती आहेत. हम्पी येथी विठाला मंदिराचा परिसर सर्वात नयनरम्य परिसरांपैकी एक आहे. हम्पीचा परिसर पाहण्यास येथे चार दिवसांचे वास्तव्य पुरेसे आहे. येथे विमानाने पोहोचण्यासाठी बेंगळूरू, हुबळी आणि बेळगावीचे विमानतळ सोयीचे आहेत. येथे चार दिवस राहण्यासाठी माणशी सुमारे बारा हजार रुपये किमान खर्च येईल.

जर थंड हवेच्या ठिकाणी जावयाचे असेल, तर लद्दाख हा ‘हटके’ पर्याय ठरू शकेल. रिकामे रस्ते, नदीचे खळाळणारे स्वच्छ पाणी, बर्फाच्या चादरीखाली झाकलेल्या पर्वतरांगा भान हरपायला लावणाऱ्या आहेत. येथे राहण्यासाठी उत्तम हॉटेल्सची व्यवस्था आहे. येथे जाऊन झान्स्कर व्हॅलीला अवश्य भेट द्यावी. येथे पोहोचण्यासाठी लेह चा विमानतळ सर्वात सोयीचा आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक जम्मू असून, तिथून लद्दाख सुमारे ६५० किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू येथून टॅक्सी किंवा बसने सुद्धा लदाख पर्यंतचा प्रवास करता येऊ शकतो.

मधुचंद्राकरिता काश्मीर सारखे सुंदर स्थळ सापडणे कठीण. इथला नयनरम्य निसर्ग, शिकारा बोटीतील सफर यांचा आनंद लुटीत आपल्या जोडीदाराबरोबर मनासारखा वेळ घालविता येतो. श्रीनगर येथे राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स आहेत, तसेच दाल लेक मधील हाऊसबोट वरील वास्तव्य हा देखील आगळा अनुभव आहे. श्रीनगरमध्ये विमानतळ आहे. श्रीनगरच्या आसपास पेहेलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या स्थळांना भेटी देण्यासाठी श्रीनगरहून टॅक्सी घेणे हा चांगला पर्याय आहे. येथे चार दिवस राहण्याचा खर्च माणशी किमान वीस हजार रुपये येऊ शकतो.

Leave a Comment