मनुष्याच्या मनातील निरनिराळ्या प्रकारची भीती


आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे भय असते. कोणाला एखाद्या प्राण्याची भीती वाटते, कोणाला अंधाराची, कोणाला उंच ठिकाणी जाण्याची भीती वाटते, तर कोणाला पाण्याची भीती मनात असते. स्वतःवर विश्वास नसणाऱ्या व्यक्ती देखील भित्रट असतात. आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर, परिस्थितीवर त्यांचा विश्वास नसल्याने त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टींबद्दल भय निर्माण होत असते. मनुष्याच्या मनावर त्याच्या मनातील भीतीचा नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या भीतीवर प्रयत्नपूर्वक ताबा मिळविल्यास भीती कायमची नाहीशी होऊ शकते.

काही व्यक्तींना लोकांसमोर जाहीरपणे बोलण्याचे भय वाटते. अश्या व्यक्ती अगदी चार लोकांसमोर देखील आपले विचार मांडू शकत नाहीत. किंबहुना त्याबाबतीत त्यांचा आत्मविश्वास अगदी दुबळा असतो. अश्या व्यक्ती इंटरव्ह्यू, प्रेझेन्टेशन इत्यादी प्रसंग हाताळण्यास असमर्थ असतात. या असमर्थतेमुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच खालावतो. काही व्यक्तींना अंधाराचे प्रचंड भय वाटते. सोबत कोणी असतानाही या व्यक्ती अंधार असलेल्या ठिकाणी जाण्यास घाबरतात. अंधारामध्ये आपल्याला काही इजा होईल अशी भीती सतत या लोकांच्या मनामध्ये घोळत असते. अश्या व्यक्तींना संध्याकाळ नंतर एकट्याने घरामध्ये राहण्याची किंवा कुठे जाण्याची देखील भीती वाटते.

ज्या व्यक्तींना पहिल्यापासून आपल्या आसपास इतर व्यक्तींना बघण्याची सवय नसते, त्या व्यक्ती एकलकोंड्या होतात. लोकांमध्ये मिसळणे, अनोळखी लोकांशी ओळख करून घेणे या गोष्टी त्यांना भयावह वाटू लागतात. एखाद्या समारंभाला जाणे त्यांना अगदी शिक्षा वाटते. अश्या व्यक्तींना इतरांच्या सहवासात राहणे, त्यांचाबरोबर संवाद साधणे या गोष्टींची भीती असते.

काही व्यक्तींना लोकांच्या गर्दीची भीती वाटते. गर्दीच्या ठिकाणी या व्यक्तींचा जीव अक्षरशः घाबरा होतो. अश्या व्यक्ती गर्दीमध्ये जाण्याच्या कल्पनेनेच व्याकूळ होतात. पण त्यांच्या ओळखीच्या, विश्वासाच्या व्यक्तींच्या सहवासात या व्यक्ती अगदी आनंदी असतात. काही लोकांना उंच ठिकाणांचे भय असते. उंचीवर गेल्यानंतर त्यांना चक्कर येणे, डोळे फिरणे अश्या घटना देखील घडू शकतात. उंचीप्रमाणेच काही लोकांना पाण्याची देखील भीती असते. पाणी खोल असो वा नसो, या व्यक्ती पाण्यापासून लांब राहणेच पसंत करतात.

Leave a Comment