रोज दात ब्रश केल्याने टळतो अन्ननलिकेचा कर्करोग


दररोज सकाळी उठल्यावर दात ब्रश करणे किंवा दातांची सफाई करणे आपल्या दैनंदिन सवयींमधील एक सवय आहे. आपण दररोज दातांची स्वच्छता करतो कारण त्यामुळे आपल्या दातांवरील प्लाक दूर होऊन दातांना कीड लागत नाही. तसेच जेवणानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण देखील ब्रश केल्याने निघून जातात. आपल्या दातांवर बॅक्टेरियांच्यामुळे एक पातळ थर तयार होतो. या थराला ’प्लाक’ असे म्हटले जाते. जा हे प्लाक हटविले गेले नाही, तर या प्लाकचे रूपांतर पुढे दातांच्या किडीमध्ये होते. त्यामुळे हा थर हटविण्याकरिता दररोज दातांची स्वच्छता करणे गरजेचे असते. दात ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते, व दात संपूर्णपणे निरोगी राहतात. नुकत्याच केलेल्या एका रिसर्च नुसार तोंडामध्ये अन्नाचे कण साठल्याने तयार होणारे बॅक्टेरिया अन्ननलिकेत गेल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले गेले आहे. ‘ कॅन्सर रिसर्च ‘ नामक पत्रिकेमध्ये या बद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या रिसर्चमध्ये सहभागी झालेले आणि न्युयोर्क युनिव्हर्सिटीतील मेडिसिन विभागाचे सहायक प्राध्यापक जियांग अह्न यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्ननलिकेचा कर्करोग सर्वसामान्यपाने आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक असून, ज्या कर्करोगांमुळे सर्वाधिक बळी जातात, अश्या कर्करोगांपैकी अन्ननलिकेचा कर्करोग एक आहे. याचे मुख्य कारण असे, की हा कर्करोग लवकर लक्षात येत नाही, आणि जो पर्यंत निदान होते तोपर्यंत उपचार करण्यास बहुतेक वेळा खूपच उशीर झालेला असतो. अन्ननलिकेचा कर्करोग झालेले रुग्ण बरे होण्याची शक्यता केवळ १५ टे २५ टक्के असल्याचे या रिसर्चमध्ये म्हटले आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगांमध्ये एसोफ़ेजीयल एडनोकारसिनोमा ( EAC )आणि एसोफेजीयल स्क्वेमास सेल कारसिनोमा ( ESSC ) हे मुख्यत्वे दोन कर्करोग पहावयास मिळतात. या रिसर्चनुसार टेनेरीला फोर्सिथिया नामक तोंडामध्ये असणारा जीवाणू अन्ननलिकेच्या EAC साठी काही अंशी जबाबदार आहे, तर ESSC करिता पोर्फीरोमोनास जिंजीवलीस नामक जीवाणू जबाबदार असल्याचे समजते. हे दोन्ही प्रकारचे जीवाणू हिरड्यांच्या निरनिराळ्या विकारांसाठी देखील कारणीभूत असतात.

भारतामध्ये दातांशी निगडीत समस्यांकडे फार लक्ष न देण्याची मानसिकता आहे. म्हणजे, दर ठराविक काळानंतर आवर्जून डेन्टीस्टकडे जाऊन नियमित चेक-अप करविणारे लोक कमीच आढळतात. दातदुखी सुरु झाली आणि अगदीच सहन होईनाशी झाली, तरच दातांच्या डॉक्टर कडे जाणे होते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याशी संबंधित इतर बाबींची माहितीही कमीच असते. भारतामध्ये इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे नुकत्याच केल्या गेलेल्या रिसर्च मध्ये जवळ जवळ ९५ टक्के लोकांना हिराड्यांशी किंवा दातांशी निगडीत समस्या असल्याचे निदान करण्यात आले असून, या पैकी पन्नास टक्के लोक दातांच्या स्वच्छतेकरिता टूथब्रशचा वापर करीत नसल्याचे समजते. त्यामुळे अश्या लोकांच्या तोंडामध्ये घातक जीवाणूंचा प्रभाव वाढून अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची संभावना वाढत असल्याचे म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment