भाजपमध्ये दाखल झाली चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी


चेन्नई – 15 वर्षांपेक्षा अधिकच काळ तामिळनाडूतील कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा होऊन उलटला असला तरी देखील आजही त्याचे अनेक किस्से चर्चिले जातात. एका अधिकाऱ्याचे शिर धडापासून वेगळे केले आणि नंतर आपल्या सहकाऱ्यांबरोबर वीरप्पनने त्या अधिकाऱ्याच्या मुंडक्याशी फुटबॉल खेळल्याचे सांगितले जाते. १८ ऑक्टोबर २००४ रोजी अशा या कुख्यात वीरपन्नचा खात्मा करण्यात आला. या वीरपन्नची मुलगी विद्याराणीने आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विद्याराणी या वकील असून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

विद्याराणी यांच्याबरोबर यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्या कृष्णनगर येथे भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामील झाल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री राधाकृष्णन हेही या वेळी उपस्थित होते. आपण गरजवंतांसाठी कायम कार्यरत राहू, असे पक्षात प्रवेश केल्यानंतर विद्याराणी यांनी म्हटले. माझ्या वडिलांचा मार्ग चुकीचा होता. पण ते नेहमी गरिबांचाच विचार करत असत, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment