तरुण, निरोगी मनुष्याला देखील येऊ शकतो हृदयविकाराचा झटका?


एखादी व्यक्ती अगदी फिट असते. नियमित व्यायाम, नियमित झोप, याबद्दल आग्रही असणारी ही व्यक्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील अतिशय काळजी घेणारी असते. अश्या व्यक्तीच्या बाबतीत हृदयविकाराचा झटका येण्याची शंका तिळमात्रही कोणाला येत नाही, कारण सर्वच बाबतीत नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या या व्यक्तीमध्ये तसे कोणतेही लक्षण कधी आढळून येत नाही. पण अचानक या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त कानी पडते आणि ज्याच्या त्याच्या मनात एकाच विचार घोळू लागतो.. इतक्या तरुण आणि निरोगी माणसाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो? काय कारण असेल?

वरकरणी निरोगी, अतिशय फिट दिसणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण त्यांच्या हृदयला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ( आर्टरी ) अडथळे असणे हे आहे. या बाबतीत कोणताही त्रास त्या व्यक्तीला कधी जाणविला नसेल, तर पुष्कळदा ह्या समस्येचे निदानच होत नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाशी निगडीत विकारांचे वेळीच निदान न झाल्याने, त्यावर उपचारही केले जात नाहीत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जेव्हा तपासण्या केल्या जातात, तेव्हाच समस्या लक्षात येते. त्यानंतर अर्थातच उपाययोजना केल्या जातात. काही दुर्दैवी व्यक्तींचा उपाय करण्यापूर्वीच मृत्यू देखील होतो.

जेव्हा हृदयाला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, तेव्हा हृदयाला आवश्यक प्राणवायू मिळत नाही. परिणामी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रिसर्च नुसार, प्रमाणाबाहेर केलेला व्यायामही हृदयविकाराच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्या मागचे कारण तितकेसे स्पष्ट नाही. वैद्यकीय सल्ला विचारात घ्यायचा झाला तर दररोज १५० मिनिटे व्यायाम शरीरासाठी पुरसा असतो. व्यायामामुळे श्वास घेण्यास त्रास होता कामा नये. तसेच व्यायाम करण्यापूर्वी आणि केल्यानंतर भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते.

शारीरिक दृष्ट्या फिट असणे आणि निरोगी असणे यात फरक आहे. शारीरिक दृष्ट्या फिट असणारी व्यक्ती निरोगी असेल असे नाही, त्याचप्रमाणे जाड व्यक्ती रोगट असेलसे नाही. मनुष्याचे आरोग्य त्याच्या खानपानाच्या सवयींवरही अवलंबून असते. अनेक शारीरिक दृष्ट्या फिट व्यक्तींच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नसल्याने निरनिराळ्या ‘डेफिशीयन्सी’ ( शरीरामध्ये पोषणाची कमतरता )उत्पन्न होत असतात. यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे, क्षार इत्यादींची शरीरामध्ये कमतरता झाल्याने पुढे अनेक व्याधींना तोंड देण्याची वेळ येते.

अनेक व्यक्ती शारीरक दृष्ट्या सुपर फिट होण्याकरिता व्यायामाची परिसीमा गाठत असतात. अश्या वेळी शरीराच्या विश्रांतीकडे हे लोक दुर्लक्ष करीत असतात. अति श्रमांनी देखील शरीरावर तणाव पडत असतो. हा तणाव प्रमाणाबाहेर वाढल्याने हृदयाची निगडीत विकार उद्भवू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment