प्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ !


एखाद्या विशिष्ट पद्धतीची वेशभूषा, केशभूषा, डायट, किंवा इतरही अनेक गोष्टी लोकप्रिय तेव्हा होतात, जेव्हा एखादी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी त्या गोष्टींचा वापर करीत असते. एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीने तो ठराविक पोषाख, किंवा केशभूषा केल्यानंतर त्या वस्तू इतक्या लोकप्रिय होतात, की त्या विशिष्ट ‘फॅशन’ची जणू लाटच येते. अश्यावेळी ती विशिष्ट फॅशन अंगिकारताना, सध्या केवळ ती गोष्ट चलनात आहे, म्हणून त्याचा स्वीकार करणारी अनेक मंडळी आपण पहात असतो. पण ही मानसिकता आजच्या काळातली नाही. ‘फॅशन’ म्हणून एखादी सेलिब्रिटी किंवा सुप्रसिद्ध व्यक्तीची वेशभूषा, केशभूषा, तिच्या सवयी, याचे अनुकरण प्राचीन काळापासून होत आले आहे. त्यामुळे प्राचीन काळी देखील चित्र विचित्र फॅशन ट्रेंड्स असलेल्या आपल्याला पहावयास मिळतात.

१८६० च्या काळामध्ये लंडनमध्ये एक विचित्र फॅशन रूढ होताना दिसू लागली. तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांची पत्नी प्रिन्सेस अलेक्झांड्रा ही त्यावेळची ‘फॅशन आयकॉन’ समजली जात असे. ती करीत असलेल्या प्रत्येक वेशभूषेचे अनुकरण करण्याबाबत तत्कालीन ब्रिटीश स्त्रिया आग्रही असत. १८६७ साली अलेक्झांड्राने अपत्याला जन्म दिल्यानंतर ती ‘ऱ्ह्युमॅटिक फिव्हर’ नामक आजाराने ग्रस्त झाली. ह्या आजरामुळे तिचा डावा पाय कायमचा अधू झाला. त्यामुळे चालताना अलेक्झांड्राला थोडेसे लंगडून चालावे लागत असे. पण अलेक्झांड्रा एक फॅशन आयकॉन असल्यामुळे आणि ती करेल त्या सर्व गोष्टी करण्याची मानसिकता तत्कालीन ब्रिटीश स्त्रियांची असल्याने इतरांनीही तिचे अनुकरण करीत लंगडत चालण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या काळी लंडनमध्ये लंगडत चालण्याची विशित्र फॅशन ट्रेंड सुरु झाली होती.

एकोणिसाव्या शतकामध्ये युरोपमध्ये अशी फॅशन ट्रेन्ड अस्तित्वात आली, ज्यामुळे अनेक महिलांच्या जीवितालाच धोका उद्भविला. त्या काळी एका विशिष्ट हिरव्या रंगाची छटा असलेल्या कपड्याचे पोशाख घालण्याची फॅशन आली. यामध्ये विशेष गोष्ट अशी, की ही विशिष्ट हिरवी छटा, कपड्यावर आर्सेनिक नामक विषाने प्रक्रिया करून तयार केली जात असे. पण त्याकाळी ह्या रंगाच्या कपड्याची फॅशन इतकी चलनात होती, की हा कपडा वापरून आपण आपला जीव धोक्यात घालतो आहतो हे समजून घेण्याची स्त्रियांची तयारीच नव्हती. ह्या कापडाने बनलेले पोशाख परिधान करणाऱ्या स्त्रियांच्या त्वचेवर मोठे अल्सर्स येत असत. शिवाय हा कपडा तयार करण्याऱ्या कारागिरांना देखील ह्यापासून अपाय होत असे.

अठराव्या शतकामध्ये साखर हा पदार्थ ब्रिटनमध्ये अत्यधिक खप असणारा पदार्थ होता. तसेच हा पदार्थ केवळ श्रीमंत लोकांनाच मुबलक मात्रेमध्ये खरेदी करता येण्यासारखा होता. अठरावे शतक संपता संपता साखरेचा खप ब्रिटनमध्ये पाचपटीने वाढला. केवळ ब्रिटनमधेच नाही, तर संपूर्ण युरोपातच साखर हा पदार्थ व्यापाराच्या दृष्टीनेही सर्वोत्तम होता. हा पदार्थ लोकप्रियही होताच. त्यामुळे श्रीमंत घरांमध्ये साखरेने तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची रेलचेल असे. साखरेचे अतिसेवन, आणि दातांची योग्य निगा न राखल्यामुळे लोकांच्या दातांमध्ये कीड पडून ते काळे होऊ लागले. त्यामुळे काळे दात असणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये साखर मुबलक मात्रेमध्ये उपलब्ध आहे हे लोक ओळखू लागले. साखर हा पदार्थ केवळ श्रीमंतांना खरेदी करता येण्याजोगा असल्याने, ती खरेदी करणे आणि तिचे सेवन केल्याने काळे झालेले, किडलेले दात मानाचे प्रतीक मानले जात असत. त्यामुळे निर्धन लोक देखील आपले दात मुद्दाम काळ्या रंगाने रंगवीत असत. तशी फॅशनच त्याकाळी रूढ झाली होती.

Leave a Comment