‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीच्या हत्येसाठी 10 लाखांचे बक्षीस


बंगळुरू : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात गुरुवारी सायंकाळी एक रॅलीमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणारी अमूल्या लियोना हिची हत्या करण्यासाठी दक्षिणपंथी संघटना श्री राम सेनेच्या एका कार्यकर्त्याने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

श्री राम सेनेचे कार्यकर्ता संजीव मारदी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे अमूल्या हिला जामीन देऊ नका, असे आवाहन केले आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये अन्यथा तिला जीवे मारण्यात येईल, असे म्हटले आहे. शनिवारी बेल्लारी येथील श्री राम सेनेद्वारे आयोजित एका रॅलीत अमूल्या हिच्या विरोधात मारदी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत राज्य आणि केंद्र यांनी तरुणीची सुटका करू नये. अन्यथा आम्ही तिला जीवे मारू. पुढे जाऊन ते असेही म्हणाले की, अमूल्याची हत्या करणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस श्री राम सेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. बेल्लारीच्या पोलीस अधिक्षकांनी याबाबत नकार दिला असून यासंदर्भात त्यांनी कोणताही व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले. याबाबत चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले.

ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सीएए-एनआरसी विरोधातील सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. थेट व्यासपीठावरून एका तरुणीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. अमूल्या असे तरुणीचे नाव सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भारत जिंदाबाद था और रहेगा, आम्ही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेचे समर्थन करत नाही.

असदुद्दीन ओवेसी सभेत भाषण करण्यासाठी उभे राहिले असता माईक हातात घेऊन अमूल्या हिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. तरुणीने व्यासपीठावर येत तुम्हाला ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते, असे सांगत ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.