या राष्ट्रीय उद्यानातून गायब झाले तब्बल 26 वाघ

राजस्थानच्या सवाईमाधोपूर येथील प्रसिद्ध रणथंभोर टायर रिझर्व्हमधून 26 वाघ गायब झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे. याबाबत राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या सदस्या आणि खासदार दीया कुमारी यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून याबाबत उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या पत्रामध्ये राज्य सरकारला सोपविण्यात आलेल्या एका विश्वसनीय रिपोर्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. रिपोर्टनुसार, रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील 116 वाघांची परिस्थिती चिंताजनक असून, 26 वाघ गायब झाले आहेत.

दीया कुमारी यांनी पत्रात, उद्यानाच्या संबंधीत अधिकाऱ्यांचे वर्तन हे अर्धवट आणि अभावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या घटनेस जबाबदार शिकाऱ्यांना अटक करण्यात यावी व त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असे पुन्हा घडणार नाही, अशी मागणी देखील केली आहे.

मुख्य वन्यजीव वॉर्डन असलेले अरिंधम तोमर म्हणाले की, हे वाघ 2012 ते 2018 या काळात गायब झालेले आहेत. एक एक करून आम्ही या वाघांचा मागोवा घेत आहोत. त्यांचे शव सापडले नसल्याने ते गायब झाले आहेत, असे म्हणता येईल.

Leave a Comment