अमेरिकेतील या शहरात मोबाईल इंटरनेट बंदी


फोटो सौजन्य व्हर्जिनिया टुरिझम
सर्व जग इंटरनेटने जोडले जात असताना अमेरिकेतील एका शहरात मात्र मोबाईल, इंटरनेट इतकेच काय पण कॉर्डलेस फोन, मायक्रोवेव्ह वापरावर बंदी आहे. वेस्ट वर्जिनियातील कौंटी पोकाहॉन्टस मधील ग्रीन बँक असे या शहराचे नाव आहे. या शहराची वस्ती अवघी १५० नागरिक असून येथे जगातील सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण आहे. ग्रीन बँक टेलेस्कोप (जीबीटी) ही सर्वात मोठी दुर्बिण असली तरी ती एका जागेहून दुसरीकडे हलविता येते.

अमेरिकेची ही राष्ट्रीय विज्ञान वेधशाळा १९५८ मध्ये स्थापन झाली असून रेडीओ खगोल विज्ञानासाठी ती फारच महत्वाची आहे. अंतराळातील आकाशपिंडांकडून येणाऱ्या रेडीओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. ही दुर्बिण ४८५ फुट व्यासाची आहे. तिची अँटेना फुटबॉल स्टेडियम एवढी आहे. १३ अब्ज प्रकाशवर्षे दूरवरून येणारे सिग्नल ही दुर्बिण पकडू शकते. पृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहावर जीवसृष्टी आहे काय आणि तेथून काही सिग्नल येतात काय याचे खोल संशोधन येथे केले जाते.

त्यामुळे अन्य लहरींमुळे या लहरी डिस्टर्ब होऊ शकतात हे लक्षात घेऊन येथे मोबाईल टॉवर, टीव्ही टॉवर, रेडीओवर बंदी आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाईल, टीव्ही, आयपॅड, कॉर्डलेस फोन, वायरलेस हेडफोन, ब्ल्यू टूथ, मायक्रोओव्हन, रिमोट कंट्रोलवर चालणारी खेळणी यांचा वापर करता येत नाही. ही वेधशाळा स्थापन करताना आसपास वस्ती नसेल आणि सिग्नल पकडण्यात अडचण होणार नाही अशा जागेचा शोध घेऊन ती स्थापन केली गेली आहे. एलियन्सवर येथे विशेष संशोधन केले जाते.

Leave a Comment