नक्की काय आहे ट्रम्प यांच्यासोबतचा फुटबॉल आणि बिस्कीट


फोटो सौजन्य बीबीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहेत. ट्रम्प जेव्हा व्हाईट हाउसच्या बाहेर अथवा परदेशात जातात तेव्हा त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे एक फुटबॉल आणि बिस्कीट असते. या फुटबॉल आणि बिस्किटात सारे जग नष्ट करण्याची ताकद असल्याचे सांगितले जाते. तर हा फुटबॉल आणि बिस्कीट म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ.

फुटबॉल ही डुकराच्या कातड्यापासून बनविलेली काळ्या रंगाची एक खास टॉप सिक्रेट ब्रीफकेस असून ही जगातील सर्वात शक्तिशाली ब्रीफकेस मानली जाते. यात अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ला लाँच कोड सह अन्य महत्वाच्या चार गोष्टी आहेत. म्हणून त्याला न्युक्लिअर फुटबॉल म्हटले जाते. या ब्रीफकेसमध्ये अणुहल्ल्याची पूर्ण योजना, टार्गेट यांची माहिती एका खास पुस्तकात असून ७५ पानांचे हे पुस्तक एखाद्या रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्ड प्रमाणे दिसते. त्यात आणखीही एक काळे पुस्तक असून अणुहल्ला झालाच तर सुरक्षित लपण्याच्या ठिकाणांची पूर्ण माहिती यात असते.


याच फुटबॉल मध्ये आपत्कालीन ब्रॉडकास्ट सिस्टीम असून फुटबॉल मध्ये ३ ते ५ इंची लांबीचे एक कार्ड असते. ते एखाद्या क्रेडीट कार्डसारखे दिसते. याला बिस्कीट म्हणतात. हे हरविले तर पाच अलार्म वाजतात. बिस्कीट हे अँटेनासह असलेले संचार उपकरण असून त्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राष्ट्रपतींशी संपर्क साधता येतो.


फुटबॉल म्हटल्या जाणाऱ्या या ब्रीफकेसचा पहिला फोटो १० मे १९६३ ला प्रथम दिसला होता. सीएनएनच्या रिपोर्ट नुसार उपराष्ट्रपतीकडेही या ब्रीफकेसचा एक क्लोन असून आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्याचा वापर करता येतो. अर्थात हा फुटबॉल अध्यक्षांच्या बरोबर असला तरी तो त्याच्यासोबत जे पाच सैन्यसहाय्यक असतात त्यांच्यापैकी एकाच्या हातात असतो. एका अंदाजानुसार अमेरिकेकडे ६१८५ अणुबॉम्ब असून त्यात पूर्ण जग नष्ट करण्याची ताकद आहे. मात्र अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी फक्त अध्यक्ष देऊ शकतात.

त्यातील बिस्कीट हरविण्याच्या घटना घडल्या आहेत. जिमी कार्टर अध्यक्ष असताना त्यांच्या सूट च्या खिशात हे बिस्कीट राहिले आणि सूट त्यासह ड्रायक्लीनला दिला गेला होता. रोनाल्ड रिगन याच्यावर हल्ला झाला तेव्हा त्याच्या सूटच्या खिशात हे बिस्कीट होते. त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले गेले तेव्हा त्यांच्या रक्ताळलेल्या कपड्यासह हे बिस्कीट कचऱ्यात टाकले गेले होते. बिल क्लिंटन यांच्या काळातही बरेच दिवस हे बिस्कीट गायब होते.

Leave a Comment