उत्तरप्रदेशात सापडले सोन्याचे प्रचंड भांडार


फोटो सौजन्य पंजाब केसरी
सोनांचल नावाने प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील पहाडात सुरु असलेल्या भू सर्व्हेक्षणात जमिनीखाली सुमारे तीन हजार टन सोने असल्याचा शोध लागला आहे. या भागात गेली अनेक वर्षे खनिज शोधाचे काम सुरु असून या जमिनीत मोठ्या प्रमाणावर सोने तसेच अन्य खनिजांचे साठे असावेत असा अंदाज पूर्वीपासून होता. या सोन्याच्या साठ्यामुळे उत्तरप्रदेश सरकारला जमिनीतून प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्याचा अंदाजानुसार या भागात किमान १२ लाख कोटी रुपये किमतीचे सोने साठे आहेत. भूवैज्ञानिक जिल्ह्याच्या अनेक भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भू भौतिकिक सर्व्हेक्षण करत आहेत. यात विद्युतचुंबकीय व स्पेक्ट्रोमीटर उपकरणाचा वापर केला जात असून त्याचा काही भाग हेलिकॉप्टरच्या खाली लटकावून ठेवला जातो. हेलीकॉप्टर ६० ते ८० फुटावरून उडते.

सोनभद्रचे डीएम राजलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनपहाडी मध्ये २९४३.२६ टन सोने भांडार असून हल्दी ब्लॉक मध्ये ६४६.१५ किलो सोने आहे. त्याशिवाय या भागात युरेनियम, लोखंडासह अन्य खानिजेही विपुल प्रमाणात आहेत. १०८ हेक्टर भागात हे खनिज भांडार पसरलेले आहे.

Leave a Comment