येथे आहे भीमाने स्थापन केलेले सर्वात मोठे शिवलिंग


फोटो सौजन्य पत्रिका
आज महाशिवरात्र. देशभर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात शिवमंदिरे आहेत. शिवाची पूजा लिंगस्वरुपात करण्याची प्रथा आहे. जगातील सर्वात मोठे शिवलिंग उत्तरप्रदेशात गोंडा जिल्ह्यात खरगपूर येथे असून त्याला पृथ्वीनाथ मंदिर असे म्हटले जाते. या शिवलिंगाची स्थापना भीमाने केली होती असे मानतात.

या विषयीची अशी कथा सांगतात की द्वापार युगात पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी गुप्तपणे राहत होते. तेव्हा गावातील लोकांना त्रास देणाऱ्या बकासुराचा वध भीमाने केला होता. त्यामुळे त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्यातून दोषमुक्त होण्यासाठी भीमाने हे शिवलिंग स्थापन केले. हे लिंग सात खंडाचे असून ते जमिनीच्या वर १५ फुट तर जमिनीखाली ६४ फुट आहे असे सांगितले जाते. हे शिवलिंग कालांतराने हळू हळू जमिनीत गाडले गेले होते.


इतिहासकरांच्या मते मुगल सम्राटाच्या एका सेनापतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. असे सांगतात की राजा मानसिंग यांच्या परवानगीने पृथ्वीराजसिंग नावाच्या माणसाने घर बांधण्यासाठी येथे पाया खणायला सुरवात केली तेव्हा त्याला स्वप्न पडले आणि जमिनीखाली सात खंडाचे शिवलिंग आहे असा दृष्टांत झाला. त्यानंतर त्याने खोदकाम करून शिवलिंगाची पूजा केली आणि तेथे मंदिर बांधले म्हणून त्याचे नाव पृथ्वीनाथ असे पडले.

Leave a Comment