अॅडल्ट व्हॅक्सिनेशन (प्रौढांसाठी लसीकरण) म्हणजे नेमके काय?


जगभरातील इतर देशांमधील नागरिकांप्रमाणे, भारतातील नागरिकांना देखील अनेक निरनिराळ्या व्याधींना सामोरे जावे लागत असते. या व्याधींच्या उपचारांकरिता वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. पण मुळातच या व्याधी उद्भवू नयेत, या करिता लसीकरण उपलब्ध असल्याचे लोकांना बहुतेकवेळी माहीतच नसते. ज्याप्रमाणे लहान मुलांचा निरनिराळ्या व्याधींपासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध असते, त्याचप्रमाणे अनेक व्याधींपासून प्रौढांचा बचाव करणाऱ्या लसी देखील उपलब्ध असतात. पण याबद्दल फारशी माहिती नसल्याने या लसींचा उपयोग केला जात नाही. यासंबंधी नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये बहुतेक लोकांना प्रौढ लसीकरणा बद्दल अजिबात कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. लसीकरण हे केवळ लहान मुलांसाठीच असल्याची बहुतांश लोकांची समजूत होती. त्यातूनही प्रौढ लसीकरणाबद्दल ज्यांना माहिती होती, त्यांना आपण निरोगी असल्याने आपल्याला लसीकरणाची आवश्यकता नाही असे वाटत होते.

इंडियन मेडिकल असोसिएशननुसार, केवळ लहान मुलांनाच नाही, तर प्रौढांनाही लसीकरणाची आवश्यकता असते. लहान असताना दिली गेलेली लस व्याधींपासून बचाव करते, पण तो बचाव काही वर्षांपुरताच सीमित असतो. त्यामुळे निरनिराळ्या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रौढांनाही लसीकरणाची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार, नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे ठराविक काळानंतर नियमितपणे करविलेल्या वैद्यकीय तपासण्या देखील मनुष्य निरोगी आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी आवश्यक असतात. अश्या वेळी निरनिराळ्या व्याधींपासून बचाव करण्यासाठी प्रौढांनी लसीकरण करविणे हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये अनियमित खानपानाच्या सवयी, अपुरी झोप, मानसिक तणाव, कामानिमित्त सतत प्रवास, शरीराला मिळणारे अपुरे पोषण इत्यादी गोष्टींमुळे मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. अश्या वेळी कोणत्याही प्रकारच्या व्याधीने मनुष्य सहजासहजी ग्रस्त होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण करवून घेण्याचा विचार करणे अगत्याचे ठरत आहे.

भारत सरकारतर्फे देखील प्रौढांच्या लसीकरणाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये टीबी, टेटनस, डीप्थीरिया, पोलियो, आणि डांग्या खोकला या व्याधींसाठी लसीकरण उपलब्ध आहे. पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे फ्लू, न्युमोकोकल विकार ( निमोनिया, सेप्सिस, मेनिन्जायटीस ), हेपाटायटीस बी, टेटनस, इत्यादी रोगांना बळी पडू शकतात. अश्या वेळी लसीकरण करविल्याने या रोगांपासून बचाव होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment