अहवाल : शाळेच्या दप्तराचे ओझे उचलणारे विद्यार्थी असतात तंदुरुस्त

शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांच्या बॅगेचे ओझे बाळगावे लागते, अशी तक्रार आपल्याकडे अनेकदा होत असते. मात्र आता शाळेच्या बॅगेचे अधिक ओझे उचलणारे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त असतात, असा दावा अमेरिकन जर्नल ऑफ हेल्थ एज्युकेशनच्या एका अहवालात करण्यात आला आहे.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, जी मुले वजनदार बॅग उचलतात. त्यांच्या पोट व पाठीच्या मांसपेशी अधिक मजबूत असतात. यामुळे ते अधिक सक्रीय आणि तंदुरुस्त असतात.

ह्युस्टन येथील राइस यूनिवर्सिटीने 12 ते 17 वर्षीय 6 हजार मुलांच्या आरोग्यावर केलेल्या अभ्यासानुसार, शाळेची वजनदार बॅग उचलणाऱ्या मुलांचा विकास अन्य मुलांच्या तुलनेत अधिक होतो. अमेरिकन कायरोप्रॅक्टिक असोसिएशनचे म्हणणे आहे की, मुलांच्या शालेय बॅगचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 5 ते 10 टक्केच असावे.

या अभ्यासात 132 विद्यार्थ्यांचे दोन वेगवेगळे गट पाडण्यात आले होते. एका गटाने आपल्या वजनानुसार 10 टक्के वजन उचलले आणि दुसऱ्या गटाने 25 टक्के वजन उचलले. ही प्रक्रिया जवळपास 2 महिने चालली. जास्त वजन उचलणारे विद्यार्थी दुसऱ्या गटाच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त होते.

अंतर्गत परिक्षेत देखील जास्त वजन उचलणाऱ्या गटाने चांगली कामगिरी केली व त्यांनी आरोग्याबाबत तक्रार देखील केली नाही. मात्र कमी वजन उचलणाऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी स्नायूंवर ताण पडल्याची तक्रार केली.

मुख्य संशोधक लॉरा काबिरी म्हणाल्या की, या अभ्यासाद्वारे आम्ही मुलाच्या बॅगेचे वजन वाढवण्याचे सुचित करत नाही. उलट आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की, जास्त वजन देखील मुलांना तंदुरुस्त ठेवते. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.

Leave a Comment