चक्क 3डी प्रिटिंगने जोडण्यात आले तुटलेल्या कानाचे हाड

दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी 3डी प्रिटिंग तंत्रज्ञानाद्वारे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या कानाचे तुटलेले हाड जोडले असून, कानाचा पडदा देखील ठीक करण्यात आला आहे. कार अपघातात व्यक्तीच्या कानाला जबरदस्त दुखापत झाल्याने त्याला ऐकू येत नव्हते व त्याच्या कानाचे हाड तुटले होते.

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की 3डी प्रिटिंग तंत्रज्ञानाद्वारे अशा प्रकारचा उपचार जगात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. प्रिटोरिया यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि वैज्ञानिक मशूदू सिफुलारो यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने 3डी तंत्रज्ञानाद्वारे ग्राउंडब्रेकिंग शस्त्रक्रिया करत ही कामगिरी केली आहे.

टीमने प्रिंटरच्या मदतीने कानाच्या नुकसान झालेल्या भागाला स्कॅन केले. त्यानंतर प्रयोगाद्वारे तुटलेली हाडांचे पुनर्निर्माण केले.

हे तंत्रज्ञान शरीरातील सर्वात छोट्या हाडाला देखील स्कॅन करून त्याचा वास्तविक आकार सांगते. या तंत्रज्ञानामुळे कानात आढळणाऱ्या काही लहान हाडांचे पुनर्निर्माण करणे शक्य झाले.

प्रिटोरिया यूनिवर्सिटीच्या टीमचे म्हणणे आहे की, या शोधामुळे जन्मजात बहिरेपणा, संक्रमण, मॅटाबॉलिजममुळे होणाऱ्या समस्या, कानातील आतील भागात होणारे नुकसान, लहान बाळांना जन्मताच होणाऱ्या आजारामुळे ऐकू न येणे अशा आजारांना ठीक करण्यास भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment