बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर आता मुंबईतही होणार ‘चेंज ऑफ गार्ड’

लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये दररोज होणाऱ्या ‘चेंज ऑफ गार्ड’च्या धर्तीवर आता महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात देखील ‘चेंज ऑफ गार्ड’ची सुरूवात होणार आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याची सुरूवात होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ब्रिटन राजघराण्याचे निवासस्थान बकिंगहॅम पॅलेस समोर चेंज ऑफ गार्ड पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. चेंज ऑफ गार्ड हे सन्मानार्थ सैन्याने केलेले प्रात्यक्षिक असते.चेंज ऑफ गार्ड अंतर्गत एका शिफ्टचे सुरक्षा रक्षक दुसऱ्या सुरक्षा रक्षकांकडे कार्यभार सोपवतात.

अनिल देशमुख यांच्यानुसार, हे मुंबईतील सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच देश-परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. गृहमंत्री देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस मुख्यालयाला भेट देऊन याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

शहीद जवानांच्या सन्मानार्थ पोलीस मुख्यालयात शहीद गॅलेरी बनवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यापासून दर रविवारी पोलीस मुख्यालयात चेंज ऑफ गार्डचे आयोजन करण्यात येईल.

Leave a Comment