बिननावाचे रेल्वे स्टेशन


फोटो सौजन्य लल्लन टॉॉप
मेरा भारत महान असे आपण म्हणतो आणि त्याची प्रचीती अनेक गोष्टीतून आपल्याला येत असते. भारतीय रेल्वे जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी एक आहे. आणि रेल्वेची देशात सुमारे सात हजार स्टेशन्स आहेत. अर्थात प्रत्येक स्टेशनला त्याची ओळख आहे. म्हणजे त्यांना नावे दिली गेली आहेत. अनेक स्टेशनची नावे बदलली गेली असली तरी त्यांना नवी नावे मिळाली आहेत. पश्चिम बंगालच्या वर्धमान पासून ३५ किमीवर असलेले एक स्टेशन मात्र याला अपवाद आहे. हे स्टेशन सुरु होऊन वर्षे लोटली आहेत पण त्याला नाव नाही. म्हणजे हे बिननावाचे स्टेशन आहे.

रैना आणि रैनागढ या दोन गावांच्या मध्ये हे स्टेशन आहे. बांकुरा मासग्राम रेल्वे लाईनवर असलेल्या या स्टेशनला नाव नाही कारण त्यासाठी दोन गावात भांडणे सुरु आहेत आणि त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. रैना गावाच्या जमिनीवर हे स्टेशन असल्याने त्याला रैना नाव हवे असा या ग्रामस्थांचा आग्रह आहे तर रैनागढ वाल्यांना त्याच्या गावाचे नाव स्टेशनला द्यायला हवे आहे. हा मामला रेल्वेबोर्ड कडे गेला असून तो अजून प्रलंबित आहे.

विशेष म्हणजे या स्टेशनचे तिकीट रेनागढ नावाने दिले जाते. पूर्वी रेल्वे स्टेशन बोर्डावर हेच नाव होते पण भांडण सुरु झाल्यावर रेल्वेने हे नाव पुसून टाकले आहे. त्यामुळे बोर्डवर नाव नाही. या स्टेशनवर प्रवाशांची बऱ्यापैकी वर्दळ आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या प्रवाशांना स्टेशनला नाव नसल्याने थोडी अडचण होते. पण एकमेकांना विचारून प्रवासी आपले उतरायचे ठिकाण हेच आहे याची खात्री करून घेतात आणि स्टेशनवर उतरतात असे समजते.

Leave a Comment