वर्कलोडला कंटाळून विराट घेणार टी-20मधून निवृत्ती?


वेलिंग्टन : अवघ्या काही महिन्यांवर टी-20 विश्वचषक स्पर्धा येऊन ठेपली असल्यामुळे देशभरातील क्रिकेट खेळणाऱ्या संघातील क्रिकेटपटूंना त्याच्या तयारीसाठी सतत क्रिकेट खेळावे लागत आहे. परिणामी त्यांच्या फिटनेसवर याचा थेट परिणाम होत असल्यामुळे बऱ्याचवेळा खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागते. अनेकदा वर्क लोडबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भाष्य केले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयवर त्याने टीकाही केली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारे विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे कर्णधार असल्यामुळे त्यांच्यावर दबावही जास्त असतो. त्याचबरोबर त्यांना आयपीएलमुळे विश्रांतीचा कालावधी मिळत नसल्यामुळे विराट लवकरच या सगळ्याला कंटाळून निवृत्तीचा विचार करू शकतो.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता भारतीय कर्णधारांवरील कामाचा वाढता तणाव लक्षात घेता विराटही असा कठोर निर्णय घेऊ शकतो. शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला निवृत्तीबाबत विचारण्यात आले. यावेळी कोहलीने टी -20 विश्वचषक स्पर्धेनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. कोहलीने याबाबत बोलताना, तीन वर्षांपासून स्वत: ची तयारी करत असल्याचे उत्तर दिले. कोणत्याही एका प्रकारातून निवृत्तीचा विचार करण्याऐवजी तो तीन वर्षांपासून स्वतःला तयार करण्यावर भर देत असल्याचे भारतीय कर्णधार म्हणाला.

थकवा आणि वर्कलोड व्यवस्थापनाच्या विषयावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे यावेळी कोहलीने मान्य केले. त्याचबरोबर मागील 8 वर्षांपासून वर्षाचे 300 दिवस खेळत आहे. ज्यामध्ये प्रवास आणि सराव सत्रांचा समावेश असल्याचे सांगत जेव्हा मी 34 किंवा 35 वर्षांचा होईन तेव्हा मी नक्की भविष्याचा विचार करेन, असे सांगितले.

Leave a Comment