अखेर कायदेशीर नोटीशीला इंदुरीकर महाराजांनी दिले उत्तर


अहमदनगर – ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडले होते. आज त्यांनी अखेर त्यासंदर्भात आलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर दिले आहे. बुधवारी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात येऊन इंदुरीकर महाराज यांचे वकील शिवडीकर यांनी कायदेशीर नोटीसला लेखी उत्तर दिले आहे. पण यावर काहीही बोलण्यास जिल्हा रूग्णालयाच्यावतीने नकार दिला आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. आजचा या नोटीसला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार इंदुरीकर महाराजांनी आपल्या वकिलामार्फत लेखी उत्तर दिले आहे. महाराजांच्या एका सेवकासोबत बुधवारी जिल्हा रूग्णालयात दाखल होत इंदुरीकर महाराजांचे वकील शिवडीकर यांनी नोटीसला उत्तर दिले. त्याचबरोबर लवकरच पुढची भूमिका स्पष्ट करु, असे देखील शिवडीकरांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि माता-भगिनींना या सर्वांना उद्देशून त्यांनी लेखी पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे इंदुरीकर महाराजांनी लेखी पत्रात म्हटले होते. तर, इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महिला संघटनांनी केली होती.

Leave a Comment