इंदुरीकरांनी आपण चुकलो असे म्हणत आपले कार्य सुरु ठेवावे


अहमदनगर – गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जाहीर माफी मागितली आहे. इंदुरीकर महाराजांनी ओझर येथील कीर्तनामध्ये सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर आक्षेप नोंदवल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर इंदुरीकर यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर जाहीर दिलगिरी व्यक्त करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता यासंदर्भात अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी सिंधुताईंनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी इंदुरीकर महाराजांबद्दल बोलताना, इंदुरीकर हे चांगले गृहस्थ असल्याचे मत व्यक्त केले. कीर्तनकार इंदुरीकर महाराज काही पौराणिक दाखले देत असताना नकळत बोलून गेले असतील. त्याचे एवढे भांडवल कशाला करत आहात?, असा सवालही सिंधुताईंनी उपस्थित केला.

सिंधुताईंनी यावेळेस बोलताना इंदुरीकर महाराजांना एक सल्लाही दिला. कीर्तन सोडून आपण शेती करु अशी प्रतिक्रिया देणाऱ्या इंदुरीकरांना सिंधुताईंनी सल्ला देताना, असे न करण्याचा सल्ला सिंधुताईंनी दिला आहे. समाजासाठी इंदुरीकरांचे योगदान फार मोठे आहे. आपल्या कीर्तनांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले. त्यांनी या माध्यमातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला तर केलच त्याचबरोबर त्या तरुणांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्रही दिल्यामुळे इंदुरीकरांनी आपण चुकलो असे म्हणत आपले कार्य सुरु ठेवावे, असा सल्ला सिंधुताईंनी इंदुरीकरांना दिला आहे. सिंधुताईंनी इंदुरीकरांना सल्ला देतानाच टिका करणाऱ्यांनाही एक सल्ला दिला आहे. महाराजांच्या शब्दाला टीकाकारांनीही धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा, असे मत सिंधुताईंनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment