या व्यक्तीने चक्क वयाच्या 93व्या वर्षी घेतली मास्टर डिग्री

शिक्षणाला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. हीच गोष्ट एका 93 वर्षीय व्यक्तीने खरी करून दाखवली आहे. 93 वर्षीय सीआय सिवासुब्रमण्यम यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारंभात लोक प्रशासनात मास्टर डिग्री मिळवली आहे. ते मास्टर डिग्री मिळवणारे यूनिवर्सिटीचे सर्वाधिक वृद्ध विद्यार्थी ठरले आहेत. मास्टर डिग्रीनंतर आता त्यांना एमफिलचे शिक्षण घ्यायचे आहे.

सिवासुब्रमण्यम म्हणाले की, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे यापासून लांब होतो. मात्र वयाच्या 87 व्या वर्षी मला पुन्हा संधी मिळाली. 1940 मध्ये शालेय शिक्षण पुर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मला त्रिची अथवा चेन्नईला जावे लागले असते. याचवेळी आई-वडील आजारी पडले व मला त्यांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबावे लागले. तेथेच नोकरी शोधून मी काम करू लागलो. यानंतर कुटुंब दिल्लीला निघून गेले व मला वाणिज्य मंत्रालयात क्लर्क म्हणून नोकरी लागली. विभागीय परिक्षा देत संचालक झालो व 1988 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झालो. मात्र माझे ग्रॅज्युएशनचे स्वप्न अपुर्ण राहिले होते.

त्यांनी सांगितले की, त्यांना संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात देखील भाग घेण्याची संधी मिळाली होती. मात्र ते पदवीधर नव्हते, त्यामुळे जाऊ शकले नाहीत. सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण पुर्ण करता आले नाही.

Leave a Comment