मुंबईच्या क्रिकेट संघात अर्जुन तेंडुलकरची वर्णी


मुंबई : मुंबईच्या क्रिकेट संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री झाली असून अर्जुन तेंडुलकरची निवड अंडर-२३ कर्नल सीके नायडू चषकाच्या क्वार्टरफायनलसाठी करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या संघामध्ये अर्जुन तेंडुलकरसोबतच यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानचाही समावेश करण्यात आला आहे.

यशस्वी जयस्वालने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत जयस्वालने १३० पेक्षा जास्तच्या सरासरीने ४०० धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही जयस्वालच्या नावावर आहे. पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात जयस्वालने शतक झळकवले होते, तर अंतिम सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी २०१९ साली यशस्वीने अ-गटातील कारकिर्दीमध्ये द्विशतक झळकवले होते. सगळ्यात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रमही जयस्वालने आपल्या नावे केला आहे.

त्याचबरोबर हे वर्ष सरफराजसाठीही स्वप्नवत असे ठरत आहे. मुंबईला २०१९-२० या रणजी मोसमात नॉक-आऊटमध्ये प्रवेश मिळवता आला नसला, तरी सरफराजने ६ सामन्यांमध्ये १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा केल्या होत्या. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना सरफराजने नाबाद ३०१ धावा केल्यानंतर लगेच पुढच्याच सामन्यामध्ये त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद २२६ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर मध्य प्रदेशविरुद्धही सरफराजने १७७ धावांची खेळी उभारली होती. २०१८ साली अर्जुन तेंडुलकर याने श्रीलंकेविरुद्ध अंडर-१९मधून पदार्पण केले. मुंबईने मागच्यावर्षी अर्जुनची बापुना कपसाठीच्या १५ सदस्यीय संघामध्ये निवड केली. अर्जुन तेंडुलकरने अजून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.

मुंबईची संघ – हार्दिक तामोरे (कर्णधार), अमन खान, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, अग्नी चोप्रा, चिन्मय सुतार, गौरीश जाधव, वैभव कलमकर, श्रेयश गुरव, तनुष कोटियन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अंजदीप लाड, प्रशांत सोळंकी, साईराज पाटील

Leave a Comment