जग्गू दादाची दरियादिली


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
बॉलीवूड जगतात ८० च्या दशकात एक तरुण देखणा अभिनेता एकदम प्रकाशाच्या झोतात आला आणि पहिल्याच चित्रपटानंतर स्टार बनला. ही कहाणी बॉलीवूड मध्ये अनेकांसाठी फिट होत असेल पण त्यापुढची गोष्ट मात्र एकमेवाद्वितीय असेल. बालपण गरिबीत आणि मुंबईच्या चाळीत घालविलेला हा स्टार प्रसिद्धी मिळली तरी पूर्वीचे जीवन विसरला नाहीच पण गरीब लोकांसाठी त्याचा हात नेहमीच सढळ राहिला. हा अभिनेता दुसरातिसरा कुणी नसून जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफ आहे.

जग्गूदादा गरीबांचा मसीहा आहे. त्यामुळे आजही त्याचे गरिबांसाठी अकौंट असून त्यातून तो १०० कुटुंबाना मदत करतो. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात गरीब लोकांवर उपचाराचा खर्च तो देतो आणि तो पूर्वी जेथे राहायचा त्या तीन बत्ती वाळकेश्वर चाळ ते पाली हिल रस्त्यावरील भिकारी आणि अनाथ मुले यांच्याकडे त्याचा खासगी मोबाईल नंबर आहे. ते कधीही गरज भासली की जग्गू दादाला फोन करून मदत मागू शकतात. जॅकी त्याचे बालपण गेले त्या चाळीला अनेकदा भेट देतो.

बालपणात त्याच्या घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्याला ११ वी नंतर शाळा सोडावी लागली. आयुष्यात काहीतरी करायचेच या इच्छेने त्याने शेफ पासून फ्लाईट अटेंडंट पर्यंत अनेक कामे केली. मात्र एकदा बस स्टॉपवर उभा असताना एका माणूस त्याला धडकला आणि जॅकीचे मर्दानी सौंदर्य पाहून त्याने त्याला एक ऑफर दिली. हा माणूस होता सुभाष घई आणि त्यांनी जॅकीला हिरो चित्रपटात संधी दिली. त्यानंतर जॅकीने कधी मागे वळून पहिले नाही. पैशाची टंचाई जशी अनुभवली तसा पैशांचा पाउसही अंगावर पडताना पहिला, अनुभवला. पण जुने दिवस तो आजही विसरलेला नाही. गरिबी काय असते याच्या त्याच्या आठवणी अजून पुसल्या गेलेल्या नाहीत आणि यामुळेच तो गरीबांचा मसीहा आहे.

Leave a Comment