ही कंपनी 2020 मध्ये उभारणार 300 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

गेल्या काही वर्षात भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजार वाढत आहे. सरकार देखील या गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे चार्जिंग स्टेशनचा. सरकारकडून चार्जिंग स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यासोबत खाजगी कंपन्या देखील चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रयत्न करत आहे. आता टाटा पॉवरने देखील या दिशने पाऊल उचलले आहे.

टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी सांगितले की, आमची इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्याची योजना आहे. या अंतर्गत अशा स्टेशन्सची संख्या 700 होईल.

कंपनीने याआधी असे 100 स्टेशन उभारले आहेत. हे स्टेशन दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांमध्ये आहेत. मार्च 2020 मध्ये याची संख्या 300 वर पोहचवण्याची कंपनीची योजना आहे.

सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी होतील व लोकांचा खरेदीसाठी कल वाढेल.

सिन्हा म्हणाले की, कंपनी केवळ सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारत नसून, घरी देखील चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देत आहे.

कंपनी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी मेट्रो प्राधिकरण आणि महानगरपालिकेशी चर्चा करत आहे. याशिवाय इंडियन हॉटेल, टायटन वॉच शोरूम, वेस्टसाइड आणि क्रोमा सारख्या टाटा समूहाच्या दुकानांवर देखील चार्जिंग स्टेशन उभारत आहेत.

टाटा पॉवरने एचपीसीएल, आयओसीएल आणि आयजीएसच्या किरकोळ दुकानात व्यावसायिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी करार केला आहे. कंपनीने मुंबईत 30 चार्जिंग स्टेशन स्थापित केले असून, पुढील वर्षीपर्यंत ही संख्या 200 करण्याची कंपनीची योजना आहे.

Leave a Comment