…अन् स्कीईंगसाठी चक्क हेलिकॉप्टरने मागवण्यात आला 50 टन बर्फ

फ्रान्सच्या पायरेनी येथील एका प्रसिद्ध स्की रिसॉर्ट लुचोन-सुपरबॅग्नर्सने टेकड्यांवर स्कीईंग करण्यासाठी बर्फ नसल्याने चक्क हेलिकॉप्टरद्वारे बर्फ आणल्याची घटना समोर आली आहे. पर्याप्त मात्रेत बर्फ नसल्याने हे रिसॉर्ट बंद होण्याच्या स्थितीत आले होते. या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक परिषदेने थेट हेलिकॉप्टरद्वारे बर्फ आणण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसात हेलिकॉप्टरद्वारे तब्बल 50 टन बर्फ आणण्यात आला व यासाठी प्रत्येक ट्रिपमागे 6 लाख रुपये खर्च आला.

परिषदेचे प्रमुख हेरेव पुनाउ यांनी सांगितले की, संपुर्ण यूरोपमधून शेकडो पर्यटक येथे स्कीईंग करण्यासाठी येतात. आम्हाला त्यांना निराश करायचे नव्हते. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

फ्रान्समध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या काळात रिसॉर्टमध्ये गर्दी होते. हेरेव यांच्यानुसार, याद्वारे जवळपास 100 लोकांना रोजगार मिळतो. यामध्ये स्की स्कूल टीचर, लिफ्ट ऑपरेटर आणि हेल्पर सारख्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फ्रान्समधील अनेक रिसॉर्ट याच कारणामुळे बंद पडण्याची शक्यता आहे.

मात्र हेलिकॉप्टरद्वारे बर्फ आणण्याला पर्यावरणवाद्यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपण हवामान बदलाशी लढण्याच्या ऐवजी मोठी समस्या निर्माण करत आहोत. बर्फ आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उर्जा खर्च करण्यात आली. यावर हेरेव म्हणाले की, आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

Leave a Comment