माजी पोलीस आयुक्त मारिया यांचा धक्कादायक दावा


मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाशी संबंधीत आरोपी पीटर, इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती तत्कालिन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी लपवल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणावर ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकातील एका प्रकरणातून भाष्य केले आहे.

शीना बोरा हत्येचा खार पोलिसांनी छडा लावला त्यावेळी राकेश मारिया आयुक्त होते. त्यांनी या प्रकरणात साधारणत: १४ दिवस सुरू असलेल्या तपासात चार वेळा खार पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती दिली आहे. पीटर आणि इंद्राणी यांना याच ठिकाणी पहिल्यांदा भेटल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.

मी पीटरला त्यावेळी शीना बोरा बेपत्ता झाली हे तुझ्या मुलाने सांगितले त्यानंतर तू काहीच का केले नाहीस, असा सवाल केला होता. यावेळी शीना बेपत्ता झाल्यानंतर काहीच दिवसांत देवेन भारती यांची आम्ही दोघांनी भेट घेतली होती, अशी माहिती पीटरने दिली होती. देवेन भारती यांच्यासोबत या प्रकरणाबाबत अनेकदा सल्ला मसलत करत होतो, सोबत खार पोलीस ठाण्यापर्यंत एकत्रही जायचो, असे असूनही भारती यांनी हे महत्त्वाचे तपशील का लपवले, असा सवाल मारिया यांनी या उपस्थित केला आहे.

मारिया यांचा बॉलिवूडशी संबंधित कुटुंबाशी जवळचा संबंध असल्यामुळेच कदाचित पटकथा लेखनाचा हा प्रभाव असावा, अशा शब्दांत देवेन भारती यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. खटला सुरू असल्याने याविषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे देवेन भारती यांनी म्हटले आहे.

Leave a Comment