दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद डु-प्लेसिसने सोडले


मुंबई – आपल्या कसोटी आणि टी-२० कर्णधारपदाचा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने राजीनामा दिला असून नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डु प्लेसिसला वगळून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने क्विंटन डी कॉककडे संघाचे नेतृत्व दिले होते. दरम्यान डु प्लेसिसनंतर क्विंटन डी-कॉककडे आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

डु प्लेसिस राजीनाम्याविषयी बोलताना म्हणाला, योग्य संधी नवोदित खेळाडूंना मिळावी यासाठी आपण कर्णधार पदावरुन पायउतार होत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मी खेळणार असून डी कॉकला जर संघाचे नेतृत्व मिळाल्यास त्याला मदत करण्यासाठी मी नेहमी हजर आहे.

आफ्रिकेच्या संघाचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचे भाग्य मला मिळाले. या प्रवासात आनंदाचे क्षणासह खडतर क्षणही अनुभवाला मिळाले. खेळाडू म्हणून हा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. पायउतार होणे हा सर्वात कठिण निर्णय असल्याचेही डु-प्लेसिस म्हणाला.

कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एकूण ११२ आंतरराष्ट्रीय सामन्यात डु-प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने यात आफ्रिकेला ६९ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात खेळताना आफ्रिकेला मागील ८ सामन्यांपैकी ७ सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर डु-प्लेसिस टीकेचा धनी ठरला होता. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेआधी भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व डी-कॉकने केले होते. सुत्राच्या माहितीनुसार, डु-प्लेसिसच्या राजीनाम्यानंतर आता आफ्रिकेची सुत्र डी-कॉकच्या हाती जाणार आहेत.

Leave a Comment